बेळगावमधील कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका विश्वासू घरकाम करणाऱ्या व्यक्तीनेच मालकाच्या घरातून तब्बल ९३० ग्रॅम सोन्याचे दागिने चोरल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तिजोरीची चावी चोरून अत्यंत चालाखीने हा गुन्हा करणाऱ्या संशयिताला कॅम्प पोलिसांनी अटक केली आहे.

बेळगाव शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी आज पत्रकार परिषदेत या मोठ्या चोरीचा खुलासा केला. कॅम्प परिसरातील रहिवासी डॉ. विश्वनाथ धडेद यांच्या घरात झालेल्या या चोरीप्रकरणी त्यांच्या पत्नी अन्नपूर्णा धडेद यांनी ११ मे रोजी तक्रार नोंदवली होती. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून गुन्हे शाखेचे उपायुक्त निरंजनराजे अर्स, खडे बाजारचे साहाय्यक पोलीस आयुक्त शेखरप्पा आणि कॅम्पचे पोलीस निरीक्षक आनंद यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने तपास सुरू केला. या पथकाने कारवाई करत, घरातच काम करणाऱ्या कागवाड येथील राहुल सतीश कांबळे या संशयिताला अटक केली.

संशयित राहुलने कागवाडमधील बाबासाहेब कटगेरी याच्या माध्यमातून या सोन्याची विक्री करण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी त्यांच्याकडून ५२.५ लाख रुपये किमतीचे ३५० ग्रॅम सोने आणि खाजगी फायनान्स कंपन्यांमध्ये गहाण ठेवून २२.८ लाख रुपयांचे कर्ज घेतलेले सोने, असा एकूण ७३.३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. उर्वरित सोन्याचा शोध घेण्यासाठी तपास सुरू असून, या यशस्वी कारवाईबद्दल पोलीस आयुक्तांनी तपास पथकाला रोख बक्षीस जाहीर केले आहे. तसेच नागरिकांनी घरात एवढ्या मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने ठेवू नयेत, असे आवाहनही त्यांनी केले.
या पत्रकार परिषदेला पोलीस उपायुक्त निरंजनराजे अर्स, नारायण बरमनी यांच्यासह इतर पोलीस अधिकारी उपस्थित होते.


Recent Comments