Belagavi

अल्पवयीन मुलांचा दुचाकी देणे पालकांना पडले महागात

Share

बेळगाव शहरात अल्पवयीन मुलांनी राजरोसपणे दुचाकी चालवल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शहर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या या मुलांच्या पालकांचा शोध घेऊन पोलिसांनी तब्बल २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला असून वाहनही जप्त केले आहे.

बेळगावमधील एका जागरूक नागरिकाने सोशल मीडियाच्या माध्यमातून चिमुकली मुले स्कूटी चालवत असल्याचा फोटो पोलीस विभागाला टॅग करून पाठवला होता. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने संबंधित वाहनधारकाचा शोध घेऊन पालकांना नोटीस बजावली. तसेच दुचाकी जप्त करून २५ हजार रुपयांचा दंड सुनावला. दंडाची रक्कम भरल्यानंतर न्यायालयातूनच हे वाहन सोडवून घ्यावे लागणार आहे.

या संदर्भात शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी पालकांना कडक इशारा दिला आहे. पालकांनी आपल्या अल्पवयीन मुलांना वाहने देणे हे स्वतःच्या आणि इतर नागरिकांच्या जिवासाठी धोक्याचे आहे. त्यामुळे यापुढे पालकांनी अल्पवयीन मुलांना वाहने चालवण्यास दिल्यास त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

Tags: