Belagavi

बेळगावात सीसीबीची कारवाई; ३.२८ लाखांचे हेरॉईन जप्त

Share

बेळगावात अंमली पदार्थ विरोधी मोहिमेत सीसीबी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मुतगा-शिंदोळी रस्त्यावरील एका निर्जन ठिकाणी हेरॉईनची विक्री करणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून लाखो रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आहे. या गुन्ह्यामागे मुंबईतील एका महिलेचा हात असल्याचे तपासात उघड झाले आहे.

बेळगावमधील मुतगा-शिंदोळी रस्त्याशेजारील झुडपांच्या आडोशाला सार्वजनिक ठिकाणी हेरॉईन विकणारा समीर महमदशरीफ मुल्ला या २१ वर्षीय आरोपीला सीसीबीचे पीआय मंजुनाथ नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय मंजुनाथ भजंत्री आणि पथकाने छापा टाकून अटक केली. अटक केलेल्या आरोपीकडून ३,२८,००० रुपये किमतीचे १६.४० ग्रॅम हेरॉईन, ५,००० रुपयांचा मोबाईल आणि २२० रुपयांची रोख रक्कम असा एकूण ३,३३,२२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीची सखोल चौकशी केली असता, त्याने हा अंमली पदार्थ मुंबईतील सायन कोळीवाडा येथील रहिवासी सावंती अम्मा नामक महिलेकडून आणल्याची कबुली दिली आहे.

या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध मलीहाळ पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्य आरोपीचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे. सीसीबी पोलिसांच्या या कामगिरीबद्दल बेळगाव शहर पोलीस आयुक्त आणि पोलीस उपआयुक्तांनी (डीसीपी) त्यांचे कौतुक केले आहे.

Tags: