Belagavi

बेळगाव तालुक्यात पूर्ववैमनस्यातून तरुणाची धारदार शस्त्राने निघृण हत्या

Share

बेळगाव तालुक्यात पूर्ववैमनस्यातून एका तरुणाची निर्जन स्थळी नेऊन धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हुंचेनट्टी गावाच्या शिवारात हा प्रकार घडला असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मजगावमधील रहिवासी असलेला राहुल तळवार हा बावीस वर्षीय तरुण या हत्येत बळी पडला आहे. संशयित आरोपींनी पैसे देण्याचे आमिष दाखवून राहुल याला हुंच्यानट्टी गावाजवळील एका निर्जन भागात बोलावून घेतले. त्यानंतर तेथे पूर्ववैमनस्यातून त्याच्यावर तलवारीने भीषण हल्ला करण्यात आला.

मंजुनाथ शितीमणी यांच्यासह इतर सात ते आठ जणांच्या टोळीने राहुलवर तलवारीने सपासप वार केले. या हल्ल्यात राहुलच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली होती. त्याला तातडीने उपचारासाठी बेळगावमधील बिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

हा सर्व प्रकार पूर्ववैमनस्यातून आणि वैयक्तिक शत्रुत्वातून घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या हिंसक घटनेप्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस संशयित आरोपींचा शोध घेत आहेत.

Tags: