विजापूर जिल्ह्यातील बसवण बागेवाडी पोलीस ठाण्याच्या आवारात बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सण नियमांचे पालन करून आणि शांततेत साजरा करावा, असे आवाहन पोलीस उपअधीक्षक (डीवायएसपी) चंद्रकांत नंदरड्डी यांनी केले आहे.


बैठकीत बोलताना डीवायएसपी चंद्रकांत नंदरड्डी म्हणाले की, प्रत्येक सणासाठी शासनाचे काही नियम असतात. त्यानुसार बकरी ईदचा सण शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. सणाच्या काळात कायदा व सुव्यवस्था धोक्यात येणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. पोलिसांनी स्वच्छतेला महत्त्व देण्याचे सांगत, कुर्बानीनंतरचा कचरा पालिकेच्या वाहनांद्वारेच विल्हेवाट लावण्याचे आवाहन केले आहे.

या वेळी उपस्थित विविध समाजाच्या नेत्यांनीही आपले विचार मांडले. कोणत्याही चिथावणीखोर गोष्टींना बळी न पडता मैत्री, बंधुभाव आणि सलोख्याच्या भावनेने सण साजरा करण्याचे आवाहन त्यांनी केले. हिंदू-मुस्लिम असा कोणताही भेदभाव न ठेवता सर्वांनी एकोप्याने सण साजरा करण्याचा निर्धार या वेळी व्यक्त करण्यात आला.
पोलीस निरीक्षक (पीआय) गुरुशांत दाश्याळ यांनी स्पष्ट केले की, सणाच्या काळात कोणतीही अनुचित घटना घडल्यास तात्काळ पोलीस प्रशासनाला माहिती द्यावी. कोणीही कायदा हातात घेऊ नये. पोलीस विभाग प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून असून नागरिकांनी सतर्क राहून सण साजरा करावा.
या प्रसंगी शब्बर नदाफ, सी. जे. विजयकर, गुरु कमल साहेब कोर्बू, गुडीमणी, सिद्राम पाश्रोत्ती, रियाज डोणूर, महाताब बम्मनहळ्ळी, बसनगौडा पाटील, मेहबूब नायकौडी, परशुराम दोडमणी, श्रीशैल हेब्बाळ, मल्लिकार्जुन पुजारी, अदमसाहेब ढवळगी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments