Belagavi

रोबोटिक्स स्पर्धेत बेळगावच्या विद्यार्थ्यांची जागतिक कामगिरी

Share

भारताचे प्रतिनिधित्व करत इंडोनेशियामध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय रोबोट तंत्रज्ञान क्रीडा स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून जागतिक पातळीवर देशाचे नाव उंचावणाऱ्या बेळगावमधील नागनूर रुद्राक्षीमठाच्या श्री सिद्धरामेश्वर शिक्षण संस्थेच्या विठ्ठल गदग आणि सुशांत बंडीवड्डर या गुणवंत विद्यार्थ्यांचा हुक्केरी हिरेमठ संस्थानचे पूज्य श्री चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

हुक्केरी हिरेमठ संस्थानमध्ये झालेल्या एका साध्या आणि अर्थपूर्ण समारंभात विद्यार्थ्यांना शाल आणि पुष्पवृष्टी करून सन्मानित करण्यात आले. आजचे विद्यार्थी केवळ पुस्तकी अभ्यासापुरते मर्यादित न राहता विज्ञान, तंत्रज्ञान आणि स्टार्टअप क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी करत असल्याचे गौरवोद्गार पूज्य श्री चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी काढले.

रोबोट तंत्रज्ञान क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या या विद्यार्थ्यांनी आगामी काळात अधिक प्रगती करावी, असे सांगत त्यांच्या या यशामुळे राज्य आणि देशाची मान अभिमानाने उंचावल्याचे पूज्य श्री चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी म्हटले. तसेच विद्यार्थ्यांचे हे यश इतर तरुण पिढीसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील या यशामुळे संस्थेचे शिक्षक, पालक आणि संपूर्ण बेळगावमधील शिक्षण क्षेत्राचे नाव उज्ज्वल झाले असून, या यशासाठी परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे यावेळी कौतुक करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेच्या संचालक मंडळासह सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

या सोहळ्याला बेळगाव महानगर जिल्हा भाजप उपाध्यक्ष आणि समाजसेवक महांतेश वक्कुंद, अनुदानित कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष बसवराज हळिंगळी, दयानंद मगदुम, महांतेश यांच्या मातोश्री नीलव्वा अडीवेप्पा वकुंद, अप्पय्या मठ, किरण अष्टगी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Tags: