गरीब विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे माहेरघर असलेल्या सरकारी शाळा बंद करण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात शिंदोळी येथील ग्रामस्थांनी शाळेसमोर निदर्शने केली.

शिंदोळीमधील सरकारी शाळा केपीएस मॅग्नेट योजनेअंतर्गत मास्तमर्डी शाळेत विलीन करण्याच्या निर्णयाविरोधात ‘आमची शाळा, आमचा अभिमान’ अशा घोषणा देत आणि महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा हाती घेऊन शेकडो पालक व विद्यार्थ्यांनी शिंदोळी शाळेसमोर धरणे आंदोलन केले.

खासगी शाळांची फी परवडणारी नसल्याने गावातील सरकारी शाळा बंद झाल्यास गरिबांच्या मुलांनी शिकायचे कुठे, असा सवाल पालकांनी केला. तसेच मुलींना दुसऱ्या गावात पाठवणे सुरक्षित नसल्याने कोणत्याही परिस्थितीत शाळा बंद करू देणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया रमा नागणावर आणि लक्ष्मी करेगार यांनी दिली.
शिक्षणासाठी विविध घोषणा करणारे राज्य सरकार पडद्यामागे केपीएस शाळांची जबाबदारी खासगी संस्थाकडे सोपवून शिक्षणाचे व्यापारीकरण करण्याचा डाव आखत असल्याचा गंभीर आरोप करत गरिबांचे नुकसान करणारी ही केपीएस मॅग्नेट योजना सरकारने तातडीने रद्द करावी, अशी मागणी एआयडीएसओचे जिल्हा संयोजक महांतेश बिळूर यांनी केली. आंदोलनानंतर निलजी ग्रामपंचायतीचे अध्यक्ष सतीश शहापूरकर यांना निवेदन देण्यात आले.
शाळा बंद करणे हा गरिबांवर अन्याय असून या योजनेला पंचायतीचा पूर्ण विरोध आहे, हा ग्रामस्थांचा आवाज शिक्षण विभाग आणि सरकारपर्यंत पोहोचवला जाईल, असे आश्वासन सतीश शापूरकर यांनी दिले.
या आंदोलनात शांता शहापूरकर , शांता तिप्पण्णागोळ, भरमव्वा शापूरकर, लक्ष्मी शापूरकर, बाळव्वा अगसीमनी, माळिंगराय तिप्पण्णागोळ, भावकण्णा कणबरकर यांच्यासह मोठ्या संख्येने पालक, ग्रामस्थ आणि विद्यार्थी सहभागी झाले होते.


Recent Comments