देशातील तांत्रिक शिक्षण क्षेत्रात कर्नाटकच्या विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाने (व्हीटीयू) एक सुवर्ण इतिहास रचला आहे. बी.ई. आणि बी.टेक. अभ्यासक्रमांच्या अंतिम सत्राची परीक्षा संपल्यानंतर अवघ्या १० मिनिटांच्या आत निकाल घोषित करून विद्यापीठाने देशात एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.

शुक्रवारी संध्याकाळी ५:३० वाजता अंतिम सत्राची शेवटची परीक्षा संपली आणि अवघ्या १० मिनिटांनी, म्हणजेच संध्याकाळी ५:४० वाजता विद्यापीठाने अधिकृतपणे निकाल प्रसिद्ध केला. व्हीटीयूचे कुलगुरू प्रा. एस. विद्याशंकर आणि परीक्षा नियंत्रक प्रा. यू. जे. उज्ज्वल यांनी संयुक्तपणे हा ऐतिहासिक निकाल जाहीर केला. यंदाच्या अंतिम सत्राच्या परीक्षेला एकूण ५६,१९२ विद्यार्थी बसले होते आणि विद्यापीठाचा निकाल ९९.९८ टक्के इतका नेत्रदीपक लागला आहे. विशेष म्हणजे निकाल जाहीर होताच विद्यार्थ्यांच्या मोबाईल क्रमांकावर गुणांचा तपशील संदेशाद्वारे पाठवण्यात आला.

गेल्या वर्षांच्या तुलनेत यंदा संपूर्ण मूल्यमापन प्रक्रिया ठरलेल्या वेळेपेक्षा ८ दिवस आधीच पूर्ण करण्यात आली होती. यापूर्वी परीक्षा संपल्यानंतर एका तासाच्या आत निकाल जाहीर करण्याचा विक्रम व्हीटीयूच्या नावावर होता, मात्र यंदा स्वतःचाच विक्रम मोडीत काढत विद्यापीठाने ही किमया साधली आहे. अवघ्या १० मिनिटांत ५६,१९२ विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यासाठी अहोरात्र कष्ट घेणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे कुलगुरू प्रा. एस. विद्याशंकर यांनी मनापासून अभिनंदन केले आहे. विद्यार्थी आता विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर https://results.vtu.ac.in/ ला भेट देऊन आपली गुणपत्रिका पाहू शकतात.


Recent Comments