बेळगावमधील मराठा मंदिर येथे मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत सीमाप्रश्नाच्या न्यायालयीन लढ्यासह मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात पुढील आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार करण्यात आला.


या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी बैठकीत हुतात्मा दिन नियोजन, कन्नड संघटनांच्या भाषावादाचा निषेध आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या विशाल मोर्चाबाबत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती दिली. यासाठी येत्या ३० मे पर्यंत सर्व घटक समित्यांची बैठक घेऊन आंदोलनाची अंतिम तारीख निश्चित केली जाईल, असे प्रकाश मरगाळे यांनी सांगितले.

बैठकीत सीमाप्रश्नी महाराष्ट्र सरकारच्या उदासीनतेवर तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली. गेल्या दोन वर्षांत तज्ज्ञ व उच्चाधिकार समितीची बैठक न झाल्याने आणि मुख्यमंत्र्यांनी भेटीसाठी वेळ न दिल्यामुळे येत्या १५ दिवसांत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. भाषिक अल्पसंख्याक आयोगाच्या अहवालानुसार बेळगावमध्ये २० टक्क्यांहून अधिक मराठी भाषिक असल्याने सर्व सरकारी परिपत्रके मराठीत मिळण्यासाठी आगामी संसद अधिवेशनात आवाज उठवावा, याकरिता महाराष्ट्र सरकारवर दबाव आणण्याचा निर्णय झाला. कर्नाटक सरकार कन्नड संघटनांच्या कुरघोड्यांना खतपाणी घालत असून याविरोधात आधी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले जाईल, तरीही प्रकार न थांबल्यास समिती आपल्या पद्धतीने हे थांबवेल, अशी प्रतिक्रिया प्रकाश मरगाळे यांनी दिली.
या वेळी महापालिकेत कन्नड संघटनांकडून सीमाप्रश्नाविरोधी ठराव मांडण्याची तयारी सुरू असताना महाराष्ट्र एकीकरण समिती गप्प का, असा सवाल करत समितीच्या कार्यकर्त्यांनी बैठकीत आपली आक्रमक मते मांडली.
कोणतेही आंदोलन यशस्वी करण्यासाठी कार्यकर्त्यांचे मत सर्वात महत्त्वाचे असल्याने आधी त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली जाईल आणि त्यानंतरच योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे स्पष्टीकरण माजी महापौर मालोजीराव अष्टेकर यांनी दिले.
या बैठकीला मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे, माजी आमदार मनोहर किणेकर, शहर समितीचे कार्याध्यक्ष रणजित चव्हाण-पाटील, सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर, खानापूर समितीचे गोपाळराव पाटील, अमर येळ्ळूरकर, लक्ष्मण होनगेकर, बी. डी. मोहनगेकर, आर. सी. मोदगेकर, एम. जी. पाटील, एम. बी. गुरव, लक्ष्मण पाटील आणि अजित पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


Recent Comments