निपाणीत आयोजित करण्यात आलेल्या आश्रय योजना समितीच्या बैठकीत प्रचंड गदारोळ झाला. या गोंधळामुळे घरकुल वाटपाची प्रक्रिया तूर्तास रद्द करण्यात आली असून गरिबांचे नुकसान होत असल्याचे पाहून आमदार शशिकला जोल्ले यांना अश्रू अनावर झाले. या वादामुळे निपाणीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.


पंतप्रधान घरकुल योजनेअंतर्गत पट्टणकुडी भागातील दाईंगडे मळा येथे बांधण्यात आलेल्या घरांच्या वाटपासाठी बुधवारी विशेष बैठक बोलावण्यात आली होती. मात्र या बैठकीत लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांमध्ये एकमत न झाल्याने मोठा गदारोळ झाला आणि अखेर बैठक रद्द करावी लागली.

पहिल्या चार टप्प्यातील रक्कम जमा करणाऱ्या ६०० लाभार्थ्यांना लॉटरी पद्धतीने घरे दिली जातील, असे आमदार शशिकला जोल्ले यांनी बैठकीत स्पष्ट केले. मात्र बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांनी या प्रक्रियेला तीव्र विरोध केला. एकूण ९४८ लाभार्थ्यांनी पैसे जमा केले असल्याने सर्वांसाठीच एकत्रित लॉटरी काढावी, अशी मागणी चिंगळे यांनी लावून धरली.
लक्ष्मण चिंगळे यांच्या मागणीवर उत्तर देताना आमदारांनी सध्या ८०० घरे पूर्णपणे तयार असून त्यानुसार ८०० जणांना घरे देण्याची तयारी दर्शवली. मात्र या प्रस्तावावरूनही एकमत न झाल्याने बैठकीत उपस्थित असलेले भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांसमोर आले. दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्याने सभागृहात तणाव निर्माण झाला.
बैठक अर्धवट रद्द झाल्यानंतर आमदार शशिकला जोल्ले अत्यंत भावुक झाल्या. २००८ पासून निपाणी मतदारसंघात जनतेची कन्या म्हणून काम करत असून आजवर कधीही जात किंवा धर्माचे राजकारण केले नाही, अशा शब्दांत आमदार शशिकला जोल्ले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
मतदारसंघाच्या विकासासाठी आणि बेघरांना हक्काचे घर देण्यासाठी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवला होता. मात्र काही विरोधकांनी चांगल्या कामात विघ्न आणले असून अधिकाऱ्यांच्या चुकीच्या भूमिकेमुळे ही वेळ आली आहे, अशी खंत व्यक्त करत लाभार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत आपला लढा सुरूच राहील, असे आमदार शशिकला जोल्ले यांनी म्हटले.


Recent Comments