बेळगाव तालुक्यातील कंग्राळी बुद्रुकमध्ये सोमवारी सकाळी एका ट्रक चालकाचा मृतदेह त्याच्याच ट्रकमध्ये आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. गजानन वामन हुरुडे असे मृत व्यक्तीचे नाव असून ते कलमेश्वर गल्ली येथील रहिवासी होते.


याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गजानन हुरुडे हे रविवारी रात्री आपला ट्रक कलमेश्वर को-ऑपरेटिव्ह सोसायटीसमोर उभा करून त्यामध्येच झोपले होते. मात्र सोमवारी सकाळी ते ट्रकमध्येच बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. स्थानिक नागरिकांनी याबाबीची माहिती पोलिसांना दिल्यानंतर काकती पोलीस स्टेशनचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनी घटनास्थळाचा रीतसर पंचनामा करून मृतदेह ट्रकमधून बाहेर काढला आणि पुढील तपासासाठी तो शवविच्छेदनाकरिता जिल्हा रुग्णालयाच्या शवागारात पाठवून दिला. गजानन हुरुडे यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच त्यांच्या मृत्यूचे खरे कारण समोर येईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
ही घटना कंग्राळी बुद्रुकमधील मुख्य रस्त्यावर घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत असून काकती पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.


Recent Comments