Belagavi

बेळगावमधील मुख्य बाजारपेठेतील रस्त्यांचा कायापालट

Share

बेळगाव शहराच्या हृदयस्थानी असलेल्या व्यापारी भागातील अनेक दशकांच्या समस्येला अखेर पूर्णविराम मिळण्याची वेळ आली आहे. सतत गजबजलेल्या मुख्य बाजारपेठेतील रस्त्यांच्या विकासासाठी आमदार आसिफ सेठ यांनी अडीच कोटी रुपये खर्चाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा शुभारंभ केला आहे.

बेळगावमधील अत्यंत व्यस्त व्यापारी केंद्र असलेल्या रामदेव गल्ली, मारुती गल्ली, समादेवी गल्ली आणि किर्लोस्कर रस्त्यावरील पायाभूत सुविधांच्या विकासाला गती मिळाली आहे. आमदार आसिफ सेठ यांच्या हस्ते एकूण २.५ कोटी रुपयांच्या प्रमुख रस्ते विकासकामांचे अधिकृत भूमिपूजन करण्यात आले.

स्थानिक व्यवसायांना चालना देण्यासाठी आणि व्यापारासाठी पोषक वातावरण तयार करण्यासाठी व्यावसायिक केंद्रांमध्ये पायाभूत सुविधांचा विकास करणे अत्यंत गरजेचे आहे अशी प्रतिक्रिया आमदारांनी व्यक्त केली.

बाजारपेठेतील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांना प्राधान्य देऊन काम सुरू केल्याबद्दल व्यापारी संघटना आणि दुकानदारांनी आमदारांचे आभार मानले.

या कामाच्या उद्घाटन प्रसंगी आमदार आसिफ सेठ यांच्यासोबत अमन सेठ, स्थानिक व्यापारी संघटनेचे सदस्य, दुकानदार आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.

Tags: