Bagalkot

बागलकोट : वादळी वाऱ्यासह गारपीट

Share

बागलकोट जिल्ह्यातील बीळगी तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार गारपिटीमुळे पिकांचे आणि मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले आहे. या अचानक आलेल्या नैसर्गिक संकटामुळे तालुक्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून नागरिकांचे मोठे हाल होत आहेत.

बागलकोट जिल्ह्यातील बीळगी तालुक्यातील कोर्ती, रोळ्ळी, बाडगंडी आणि सिद्धापूर गावांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून रात्रीच्या वेळी झालेल्या मुसळधार गारपिटीने नागरिकांची दाणादाण उडवली. वादळी वाऱ्यामुळे तालुक्यात एकूण १६ गोठे, ३८ पत्र्यांची शेड आणि ३ घरे जमीनदोस्त झाली आहेत. रोळ्ळी गावात एका गायीच्या वासराचा मृत्यू झाला असून घरावरील पत्रे अंगावर पडल्याने एक जण गंभीर जखमी झाला आहे. जोरदार वाऱ्यामुळे शेकडो वीज खांब कोसळल्याने अनेक गावे अंधारात बुडाली आहेत. सध्या पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासनातर्फे टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून ते आर्थिक संकटात सापडले आहेत. अरविंदप्पा जराळी या शेतकऱ्याची तब्बल १४ एकर ऊस शेती पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून त्यांच्यासह इतर शेकडो शेतकऱ्यांची पिके मातीमोल झाली आहेत. घटनेची माहिती मिळताच बीळगीचे तहसीलदार विनोद हत्तळ्ळी यांच्या नेतृत्वाखालील अधिकाऱ्यांच्या पथकाने नुकसानग्रस्त भागांना भेट देऊन संयुक्त पाहणी आणि पंचनामे सुरू केले आहेत. यादरम्यान, शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष शिवनगौडा पाटील यांनी संकटग्रस्त बळीराजाला सरकारने तातडीने मदत करावी आणि योग्य भरपाई मंजूर करावी, अशी मागणी केली आहे.

Tags: