Vijayapura

विजापूर जिल्हा कामगार विभागाच्या कार्यालयावर लोकायुक्तांचा छापा

Share

विजापूरमधील जिल्हा कामगार विभागाच्या कार्यालयावर लोकायुक्त पोलिसांनी छापा टाकून तपासणी केली आहे. या कारवाईत कार्यालयातील मोठा गैरव्यवहार आणि प्रशासकीय अनागोंदी समोर आली आहे.

विजापूरमधील कामगार अधिकारी कार्यालयात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार होत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर लोकायुक्त न्यायाधीश बी. एस. पाटील यांनी या प्रकरणाची दखल घेत कामगार विभागाची तपासणी करण्यासाठी वॉरंट जारी केले होते. या कारवाईबाबत माहिती देताना विजापूर लोकायुक्त पोलीस अधीक्षक टी. मल्लेश यांनी सांगितले की, कामगारांना वाटप करावयाचे ४४ हजार स्मार्ट कार्ड वितरीत न करता कार्यालयातच ठेवल्याचे तपासणीत उघड झाले आहे. तसेच कामगारांना मिळणारे १ कोटी १० लाख रुपये गेल्या अनेक वर्षांपासून वितरित न करता विभागातच पडून राहिल्याचे समोर आले आहे.

कामगारांचे १,२३३ अर्ज प्रलंबित ठेवण्यात आले असून, असंघटित कामगारांच्या अपघाती मृत्यूचे अर्ज, प्रसूती सुविधेचे अर्ज आणि बालकामगार प्रकरणांमध्ये कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचे टी. मल्लेश यांनी स्पष्ट केले. लोकायुक्त पोलीस उपअधीक्षक आणि तीन पोलीस निरीक्षकांच्या पथकाने गेल्या दोन दिवसांपासून ही तपासणी केली असून, कागदपत्रांची पडताळणी अजूनही सुरू आहे. या कारवाईत लोकायुक्त पोलीस उपअधीक्षक मल्लिकार्जुन एस. तुळशीगेरी, पोलीस निरीक्षक आनंद टक्कन्नवर, आनंद दोणी आणि निंगप्पा पूजेरी सहभागी झाले होते.

Tags: