Belagavi

‘केएलएस’मध्ये विशेष कार्यशाळेचे आयोजन

Share

बेळगावमधील नामांकित केएलएस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट एज्युकरण अँड रिसर्च संस्थेत संवाद फाउंडेशनच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेली पाच दिवसीय ‘इफेक्टिव्ह पब्लिक स्पीकिंग’ मास्टर क्लास कार्यशाळा यशस्वीपणे संपन्न झाली आहे.

व्यवस्थापन शिक्षण क्षेत्रात आघाडीवर असलेल्या केएलएस आयएमईआर संस्थेने आपल्या दोन वर्षांच्या एमबीए अभ्यासक्रमासोबतच विद्यार्थ्यांच्या व्यावहारिक कौशल्यांचा विकास करण्यासाठी या विशेष प्रशिक्षणाचे आयोजन केले होते.

या पाच दिवसीय प्रशिक्षणादरम्यान स्टेज फिअर घालवणे, आवाजातील चढ-उतार, देहबोली, कार्यालयीन बैठका आणि प्रेझेंटेशन्समध्ये आत्मविश्वासाने बोलणे, तसेच औपचारिक समारंभांमधील संवाद आणि प्रभावी ‘इलेव्हेटर पिच’ तयार करणे याविषयी प्रशिक्षणार्थींना व्यावहारिक मार्गदर्शन करण्यात आले.

प्रसिद्ध संवाद प्रशिक्षक विनोद देशपांडे यांनी या कार्यशाळेत प्रशिक्षण दिले. या कार्यक्रमात उद्योग, शिक्षण, विविध क्षेत्रांतील व्यावसायिक आणि महिला उद्योजकांसह एकूण ३६ प्रशिक्षणार्थींनी उत्साहाने भाग घेतला होता.

समारोप समारंभाला हायलोक ग्रुपचे अध्यक्ष दिलीप चिटणीस मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. आरिफ शेख होते. या वेळी प्रशिक्षणार्थींनी आपले अनुभव सांगत आत्मविश्वासाने मनोगत व्यक्त केले. कार्यशाळा यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या सर्व सहभागींना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.

या मास्टर क्लास कार्यक्रमाला हायलोक ग्रुप, बेळगाव फेरोकास्ट, शांती फौमॅक, बेळगाव ऑक्सिजन आणि भरतेश एज्युकेशन ट्रस्ट यांनी प्रायोजकत्व दिले होते. वैयक्तिक आणि व्यावसायिक यशात संवाद कौशल्याचे महत्त्व अधोरेखित करत या कार्यक्रमाची सांगता झाली.

Tags: