Belagavi

बेळगावमध्ये शिवम असोसिएट्स ही बोगस कंपनी असल्याचे उघड

Share

बेळगावमधील शिवम असोसिएट्स ही संस्था बोगस असून नागरिकांनी अशा अनधिकृत कंपन्यांमध्ये आपली कष्टाची कमाई गुंतवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी केले आहे.

बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी ही माहिती दिली. जिल्ह्यात बेकायदेशीर आर्थिक व्यवहार करणाऱ्या संस्थांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि नागरिकांची फसवणूक रोखण्यासाठी विशेष पथकाची स्थापना करण्यात आली असून या बोगस कंपनीच्या व्यवहारांची सखोल चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ठेवीदारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शिवम असोसिएट्स या बोगस कंपनीकडून आरबीआयच्या मंजुरीशिवाय आणि कोणत्याही अधिकृत परवान्याशिवाय नागरिकांना जादा व्याजाचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने गेल्या महिनाभरापासून केलेल्या गुप्त तपासानंतर चार प्रमुख ठिकाणी छापे टाकून बँक खाती व महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली असून, या घोटाळ्याबाबतचा १५० पानांचा सविस्तर अहवाल शासनाकडे सादर केला आहे. या फसवणुकीचा फटका सुमारे ३५ हजारांहून अधिक नागरिकांना बसल्याचा संशय असून, जनतेने अशा कोणत्याही अनधिकृत संस्थेत गुंतवणूक करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी केले आहे.

Tags: