बागलकोट जिल्ह्यातील हुनगुंद तालुक्यातील इब्बरगी गावातील पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न गेल्या १८ वर्षांपासून रखडला असून, प्रशासनाच्या तीव्र दुर्लक्षामुळे संतापलेल्या नागरिकांचे आंदोलन आज ९ व्या दिवशीही सुरूच आहे.


सन २००७ मध्ये आलेल्या भीषण पुरात सर्वस्व गमावलेल्या इब्बरगी गावातील नागरिकांना तत्कालीन सरकारने तात्पुरत्या स्वरूपात पत्र्याच्या शेडमध्ये हलवले होते. मात्र, आज तब्बल १८ वर्षे उलटूनही २०० हून अधिक कुटुंबे याच गळक्या आणि मोडकळीस आलेल्या शेडमध्ये ऊन, वारा, पावसाचा सामना करत अत्यंत हलाखीत दिवस काढत आहेत. या शेडमध्ये मूलभूत सुविधांभावी दररोज साप, विंचू यांसारख्या विषारी प्राण्यांच्या भीतीमुळे नागरिकांना जीव मुठीत धरून राहावे लागत आहे.


या पुनर्वसन केंद्रात अद्याप रस्त्याची सोय नाही, वीज नाही आणि पिण्याच्या पाण्याचीही कोणतीही व्यवस्था नाही. पाण्यासाठी येथील महिलांना मैलोन्मैल भटकंती करावी लागत आहे. हक्काची जागा आणि हक्काचे घर मिळावे या मागणीसाठी गेल्या ९ दिवसांपासून ग्रामस्थ धरणे आंदोलनाला बसले आहेत. मात्र, अद्याप एकाही जबाबदार अधिकाऱ्याने किंवा लोकप्रतिनिधीने आंदोलनस्थळी भेट दिलेली नाही. जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पंचायत पूर्णपणे डोळेझाक करत असल्याचा आरोप करत, जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा पूरग्रस्तांनी दिला आहे.


Recent Comments