Belagavi

‘स्वच्छ बेळगाव’ कार्यक्रमाला प्रशासनाचा ब्रेक; मनपाने हटवले अनधिकृत बॅनर

Share

बेळगावमध्ये १७ मे रोजी आयोजित करण्यात आलेल्या ‘स्वच्छ बेळगाव संभ्रम’ या भव्य कार्यक्रमाला आता अडचणींचा सामना करावा लागत आहे. जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारल्यानंतर महापालिकेने शहरातील सर्व अनधिकृत फ्लेक्स हटवून आयोजकांना दणका दिला आहे.

बेळगावच्या शिवम असोसिएट्सच्या वतीने सुमारे २५ हजार लोकांना एकत्र करून सरदार मैदानावर स्वच्छता अभियानांतर्गत हा सोहळा आयोजित केला होता. मात्र, प्रशासकीय परवानगी आणि सुरक्षेच्या नियमांचे पालन न केल्याने जिल्हा प्रशासनाने या कार्यक्रमाला मज्जाव केला आहे.

जिल्हा प्रशासनाच्या या निर्णयापाठोपाठ बेळगाव महापालिकेनेही कडक पावले उचलली आहेत. शहराच्या सौंदर्याला बाधा आणणारे आणि विनापरवाना लावलेले बॅनर व जाहिरात फलक पालिकेने जप्त केले आहेत. “शहरात अनधिकृत बॅनर लावणे नियमाबाह्य असून यापुढेही अशी कारवाई सुरूच राहील,” असा इशारा मनपा आयुक्त कार्तिक एम. यांनी दिला आहे.

यापूर्वी महापालिका आयुक्तांनी स्वच्छता अभियानासाठी आणि बॅनर लावण्यासाठी तोंडी संमती दिली होती, असा दावा आयोजक अभिलाष यांनी केला आहे. मात्र, आता महापालिकेकडून बॅनर हटवले जात असून यामध्ये राजकारण केले जात असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. कोणताही राजकीय उद्देश नसताना महापालिका सहकार्य करत नसल्याने नाराजी व्यक्त करत, काहीही झाले तरी कार्यक्रम करणारच असल्याचे अभिलाष यांनी म्हटले.

दुसरीकडे, महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बॅनरवर कारवाई सुरू असून तक्रारींनंतरच हे बॅनर हटवण्यात आल्याचे आयुक्त कार्तिक एम. यांनी स्पष्ट केले. बॅनरवर महापालिकेचा नोंदणी क्रमांक असणे बंधनकारक असून नीळण्णावार यांच्या कार्यक्रमासाठी कोणतीही अधिकृत परवानगी घेण्यात आलेली नाही. हा खाजगी कार्यक्रम असल्याने महापालिकेचे सहकार्य मिळणार नाही, असे आधीच स्पष्ट करण्यात आले होते, अशी प्रतिक्रिया कार्तिक एम. यांनी दिली.

Tags: