Belagavi

बेळगावमधील बैलूरमध्ये श्री महालक्ष्मी देवीचा यात्रोत्सव उत्साहात संपन्न

Share

बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील बैलूर येथे ग्रामदैवत श्री महालक्ष्मी देवीचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात पार पडला. या उत्सवातील मुख्य आकर्षण असलेल्या ‘होन्याटा’ विधीमध्ये हजारो भाविकांनी सहभाग नोंदवला.

खानापूर तालुक्यातील प्रसिद्ध धार्मिक केंद्र असलेल्या बैलूरमध्ये श्री महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी जनसागर लोटला होता. बैलूरसह बाकनूर, मोरब आणि देवाचाहाट्टी यांसारख्या शेजारील गावांतील हजारो भाविकांनी या सोहळ्यात हजेरी लावली. यावेळी संपूर्ण मंदिर परिसरात “लक्ष्मी माता की जय” असा जयघोष करण्यात आला.

यात्रेचे मुख्य आकर्षण असलेल्या देवीच्या मिरवणुकीत भंडाऱ्याची मोठी उधळण करण्यात आली. यावेळी भाविकांनी एकमेकांवर भंडारा उडवत भक्तीचा आनंद लुटला. अबालवृद्धांसह तरुण-तरुणींनी पारंपारिक वाद्यांच्या तालावर ठेका धरत मिरवणुकीत सहभाग घेतला. भंडाऱ्याच्या उधळणीमुळे संपूर्ण गाव पिवळमय झाले होते.

भक्तांनी देवीची ओटी भरून आपली गाऱ्हाणी मांडली आणि सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. नवस पूर्ण झालेल्या भाविकांनी देवीचे दर्शन घेऊन कृतज्ञता व्यक्त केली. यात्रेनिमित्त गावात सणाचे वातावरण असून येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसादाची चोख व्यवस्था करण्यात आली होती.

Tags: