Belagavi

बाकनूर फाटा येथे धनंजय जाधव यांच्याकडून स्वखर्चाने नामफलक; प्रवाशांचा गोंधळ थांबला

Share

बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील बाकनूर फाटा येथे मार्ग सुचवणारा फलक नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. ही समस्या लक्षात घेता भाजप नेते धनंजय जाधव यांनी तत्काळ प्रतिसाद देत स्वखर्चाने नामफलक लावून प्रवाशांचा प्रश्न मार्गी लावला आहे.
बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील बाकनूर गावातील श्री महालक्ष्मी यात्रा महोत्सव सांगतेच्या टप्प्यात आहे. मात्र, बाकनूर आणि बडस गावाच्या फाट्यावर (वळणावर) गावाकडे जाण्यासाठी कोणताही दिशादर्शक फलक नव्हता. यामुळे यात्रेसाठी येणारे पाहुणे, भक्त आणि प्रवाशांना नेमके कोणत्या दिशेला जायचे, याबाबत मोठा गोंधळ होत होता.
नुकतीच भाजप बेळगाव ग्रामीणचे माजी मंडल अध्यक्ष धनंजय जाधव यांनी महालक्ष्मीच्या दर्शनासाठी गावाला भेट दिली होती. यावेळी स्थानिक कार्यकर्त्यांनी ही समस्या त्यांच्या निदर्शनास आणून दिली. नामफलकाची निकड लक्षात घेऊन धनंजय जाधव यांनी तातडीने स्वखर्चातून बाकनूर आणि बडस गावांकडे जाणारा कायमस्वरूपी नामफलक बसवून दिला आहे.
या नामफलकामुळे ग्रामस्थ आणि भाविकांनी आनंद व्यक्त करत धनंजय जाधव यांचे आभार मानले आहेत. या फलकाच्या उद्घाटन प्रसंगी के. डी. पाटील, संदीप गोडसे, के. एन. पाटील, नामदेव गोडसे, प्रल्हाद गुरव, संजय पाटील, गोपाळ गावडे, निंगू गावडे, दीपक नाईक, संभाजी नाईक, चेतन पाटील, गोपाळ पाटील, बाळू चंदीलकर, प्रकाश सुतार, कल्लाप्पा कांबळे, अनिल पाटील, परशुराम पाटील यांच्यासह बडस, बाकनूर आणि बेळवट्टी गावातील प्रमुख कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

Tags: