बेळगाव दक्षिण विधानसभा मतदारसंघातील तिसऱ्या रेल्वे गेटपासून बेमको क्रॉसपर्यंतच्या मुख्य रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाला आजपासून सुरुवात झाली आहे. आमदार अभय पाटील यांच्या हस्ते या कामाचे अधिकृत भूमिपूजन करण्यात आले.


या प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यात १० कोटी रुपये खर्चून रस्त्याचे काँक्रिटीकरण केले जाणार आहे. या भागातील रस्ते विकासासाठी एकूण २६ कोटींच्या निधीचे नियोजन करण्यात आले असून, त्यापैकी २२ कोटींच्या कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाल्याची माहिती आमदार अभय पाटील यांनी दिली.


सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत राबवण्यात येणारे हे काम पुढील ६ महिन्यांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. उर्वरित ४ कोटींचा निधीही लवकरच उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन यावेळी देण्यात आले. या कामामुळे परिसरातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे.

नगरसेवक रमेश मयल्यागोळ यांनी सांगितले की, हा मार्ग खानापूर मुख्य रस्त्याला जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. या रस्ते विकासामुळे नागरिकांची अनेक दिवसांची मागणी पूर्ण होत असून प्रवासाचा वेळ वाचणार आहे. या कार्यक्रमाला स्थानिक लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.


Recent Comments