Vijayapura

विद्यार्थ्याचे जानवे काढल्याप्रकरणी विजापुरात तीव्र संताप

Share

बेंगळुरू येथील कृपानिधी महाविद्यालयात सीईटी परीक्षेदरम्यान एका ब्राह्मण विद्यार्थ्याचे जानवे काढायला लावल्याच्या घटनेचे विजापूरमध्ये तीव्र पडसाद उमटले असून या प्रकरणाच्या एसआयटी चौकशीसाठी अखिल भारतीय ब्राह्मण महासभेने विजापूर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

बेंगळुरूच्या मडिवाळा भागातील कृपानिधी महाविद्यालयात ही घटना घडली आहे. परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्याचे जानवे काढायला लावणे हा धार्मिक परंपरेचा अवमान असल्याचे सांगत ब्राह्मण महासभेच्या विजापूर जिल्हा घटकाने या कृत्याचा निषेध केला आहे.

जानवे धारण करणे ही ब्राह्मण समाजाची पारंपारिक ओळख आणि आमचा अभिमान आहे. आमच्या अस्मितेचे प्रतीक असलेले जानवे काढायला लावणे धक्कादायक आहे. जानव्यामुळे परीक्षेत नक्कल करणे कसे काय शक्य आहे? विनाकारण विद्यार्थ्याचा आणि समाजाचा अपमान करण्यात आला आहे. गेल्या वर्षीही अशी घटना घडली होती, मात्र आता पुन्हा तोच प्रकार घडणे क्लेशदायक असल्याची प्रतिक्रिया मुकुंद कुलकर्णी यांनी व्यक्त केली.

सरकारला वारंवार सूचना देऊनही ब्राह्मण अस्मितेचे प्रतीक असलेल्या जानवे काढायला लावणे खेदजनक आहे. या घटनेत सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांना त्वरित बडतर्फ करावे. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली एसआयटी नेमून या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी. वारंवार समाजाचा अपमान करणे थांबवावे, अन्यथा राज्यभर उग्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा राघवेंद्र अलगूर यांनी दिला.

या प्रसंगी जिल्हा सरचिटणीस पवन कुलकर्णी, जिल्हा संघटक सचिव समीर कुलकर्णी, शहराध्यक्ष प्रशांत देशपांडे, युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष रोहन आपटे यांच्यासह समाजाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: