Belagavi

कोंडसकोप्पमध्ये सामाजिक बहिष्काराचा आरोप

Share

बेळगाव तालुक्यातील कोंडसकोप्प गावातील एका कुरबर समाजाच्या कुटुंबावर सामाजिक बहिष्कार टाकण्यात आल्याचा खळबळजनक आरोप झाला आहे. मात्र, दुसरीकडे समाजाच्या नेत्यांनी हे सर्व आरोप सत्य नसल्याचे स्पष्ट केले आहे.

कोंडसकोप्प गावातील काही पंचांनी मंदिराची पूजा आणि प्रेमप्रकरणाच्या वादातून हा निर्णय घेतल्याचा आरोप पीडित कुटुंबाने केला आहे. या कुटुंबासमवेत संपर्क ठेवणाऱ्याला ५००० रुपये दंड आणि माहिती देणाऱ्याला १००० रुपयांचे बक्षीस जाहीर केल्याची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या बहिष्कारामुळे कुटुंब एकाकी पडले असून, त्यांना लग्न किंवा इतर कोणत्याही सामाजिक कार्यक्रमांना बोलावले जात नाही. अगदी पाच वर्षांच्या लहान मुलाशीही गावकरी बोलत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळी या कुटुंबाच्या घरावर दगडफेक करण्यात आली असून, सध्या हे कुटुंब भीतीच्या छायेखाली जगत आहे. आम्हाला जगू द्या, अशी विनंती करत कुटुंबाने संरक्षणाची मागणी केली आहे, अशी प्रतिक्रिया पीडित कुटुंबाने दिली.

याप्रकरणी हिरेबागेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार देऊन १५ दिवस उलटले तरी अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप केला जात आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन केवळ पाहणी केल्याने स्थानिक स्तरावर नाराजी व्यक्त होत आहे. आम्हाला गाव सोडण्याची धमकी दिली जात असल्याचेही पीडित कुटुंबाने आपल्या तक्रारीत म्हटले आहे, अशी प्रतिक्रिया पीडित कुटुंबाने व्यक्त केली.

या आरोपांवर स्पष्टीकरण देताना कोंडसकोप्पचे समाज नेते विठ्ठल सांबरेकर यांनी सांगितले की, विठ्ठल सांबरेकर यांच्या कुटुंबाने दिलेली तक्रार पूर्णपणे चुकीची आहे. धार्मिक विधींच्या संदर्भात काही मतभेद झाले तेव्हा त्यांना प्रक्रियेत सहभागी न होण्यास सांगितले होते, मात्र संपूर्ण कुटुंबावर बहिष्कार टाकल्याचा दावा खोटा आहे, असे विठ्ठल सांबरेकर यांनी म्हटले.

माजी महापौर यल्लप्पा कुरबर यांनीही या वादावर भाष्य करताना सांगितले की, विठ्ठल सांबरेकर यांना गावाबाहेर काढल्याचा आरोप सत्य नाही. या प्रकरणी तासनतास सभा घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला, मात्र ते कायदेशीर लढाईवर ठाम राहिले. धार्मिक प्रथा मानणार नाही असे म्हटल्यानंतर त्यांना तिथे न येण्यास सांगितले हे खरे आहे, परंतु समाजातून बहिष्कृत करणे किंवा दंड आकारणे हे सर्व दावे धादांत खोटे आहेत, असे यल्लप्पा कुरबर यांनी स्पष्ट केले.

Tags: