Belagavi

बेळगावमध्ये बसवेश्वर जयंती आणि पुरस्कार सोहळा संपन्न

Share

१२ व्या शतकातील महान समाजसुधारक आणि वचनकार विश्वगुरू संत बसवेश्वर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांच्या विचारांचा वारसा जोपासण्याचे आवाहन साहित्यिक प्रा. एफ. डी. गड्डीगौडर यांनी केले.

कर्नाटक राज्य लेखक संघ आणि राज्य सरकारी कर्मचारी कल्याण संघ यांच्या संयुक्त विद्यमाने बेळगावमधील चन्नम्मा सर्कल येथील कन्नड साहित्य भवनमध्ये विश्वगुरू श्री बसवेश्वर जयंती आणि पुरस्कार प्रदान सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी प्रा. एफ. डी. गड्डीगौडर यांनी बसवण्णांच्या जीवन मूल्यांवर प्रकाश टाकला. विश्वगुरू बसवण्णांनी ‘कायकवे कैलास’ आणि समतेच्या विचारातून श्रमाला प्रतिष्ठा मिळवून दिली असून, युवा पिढीने ही नैतिक मूल्ये अंगीकारून प्रगत समाज घडवावा, असे प्रतिपादन प्रा. एफ. डी. गड्डीगौडर यांनी केले.

या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी कसब अध्यक्ष मोहनगौडा पाटील यांच्याहस्ते झाले. पडद्यामागे राहून समाजसेवा करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करणे हे कौतुकास्पद कार्य असल्याचे मोहनगौडा पाटील यांनी म्हटले.

याच प्रसंगी प्रा. एफ. डी. गड्डीगौडर रचित ध्वनीफितीचे प्रकाशन करण्यात आले. तसेच गीता बस्तवाड यांच्या कवितासंग्रहासाठी त्यांना पुस्तक पुरस्कार देऊन बेळगावच्या विभागीय समन्वय अधिकारी डॉ. दानम्मा झळकी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.तसेच या सोहळ्यात खानापूर लेखक संघाचे अध्यक्ष गंगाधर बडीगेर यांच्यासह नदाफ, गाणगी, हर्षाराणी कांबळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कल्पवृक्ष साहित्य व्यासपीठाचे जिल्हाध्यक्ष एम. वाय. मेणसिनकाई, डॉ. हेमा सोनळ्ळी, पृथ्वी फाऊंडेशनच्या रजनी जिरीग्याळ, सुमा दोडमनी, एससी एसटी शिक्षक व्यासपीठाचे अध्यक्ष, तसेच महेश निलजी, बसवराज मेदार, रुद्रेश बडीगेर, निंगप्पा कौजलगी, डी. डी. होळी, प्रवीण पाळेकर, ए. बी. मडीवाळर, प्रकाश बागेवाडी, रमेश बागेवाडी, महादेव निच्चणकी आदी उपस्थित होते. लेखक संघाचे बेळगाव अध्यक्ष सुरेश सक्रण्णवर यांनी स्वागत केले, महादेवी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. तर शिवानंद तल्लूर यांनी आभार मानले.

Tags: