Bagalkot

बागलकोटमध्ये दोन चिमुरड्यांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला

Share

बागलकोट शहरातील नवनगर परिसरात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन चिमुरड्या मुली कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झाल्या आहेत. वारंवार तक्रारी करूनही नगरपालिका प्रशासन सुस्त असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

बागलकोट शहरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला असून, निष्पाप बालकांवर हल्ले होण्याच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. वारंवार तक्रारी करूनही नगरपालिका प्रशासन सुस्त असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. बागलकोटमधील नवनगर सेक्टर २ आणि ३ मध्ये भटक्या कुत्र्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. सेक्टर २ मधील ३ वर्षांची अझका आणि सेक्टर ३ मधील ५ वर्षांची आशिया जमखंडी या दोन्ही मुली आपल्या घरासमोर खेळत असताना कुत्र्यांनी त्यांच्यावर झडप घातली. कुत्र्यांनी अझकाच्या मानेला गंभीर जखम केली असून आशिया देखील या हल्ल्यात जखमी झाली आहे. दोन्ही मुलींना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर संतप्त पालकांनी आणि स्थानिकांनी नगरपालिका प्रशासनाला धारेवर धरले आहे. याबाबत स्थानिक रहिवाशांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे.

नवनगर परिसरात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी अशाच एका हल्ल्यात ७ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला होता. तरीही प्रशासनाने यातून कोणताही धडा घेतलेला दिसत नाही. सध्या शाळांना सुट्ट्या असल्याने मुले घराबाहेर खेळत असतात, पण या भटक्या कुत्र्यांमुळे पालकांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे. महापालिकेने त्वरित या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा रहिवाशांनी दिला आहे.

एकूणच बागलकोट, नवनगर आणि विद्यागिरी भागात भटक्या कुत्र्यांची समस्या गंभीर बनली आहे. प्रशासनाने आता तरी जागे होऊन या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा, जेणेकरून लहान मुलांचा जीव धोक्यात येणार नाही.

Tags: