बेळगावमधील नेहरू नगर येथे २०२० मध्ये झालेल्या शाहबाज हत्या प्रकरणी आज जिल्हा न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला. शाहबाजची हत्या आणि अर्फान याच्यावर जीवघेणा हल्ला केल्याच्या आरोपाखाली न्यायालयाने चार जणांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

२५ ऑक्टोबर २०२० रोजी घडलेल्या या घटनेबाबत बेळगावच्या द्वितीय जिल्हा आणि सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. या खटल्यात ३० साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली असून १२८ हून अधिक पुरावे सादर करण्यात आले होते. सर्व पुराव्यांच्या आधारे न्यायाधीश गंगाधर के. यांनी दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
लक्ष्मण फकिरप्पा दड्डी, बसवराज होळेप्पा दड्डी, बसवराज सिद्रायी सिद्दप्पा नायक आणि नवीन सिद्दप्पा दड्डी अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. न्यायालयाने या चौघांना जन्मठेपेसह ९ लाख ६० हजार रुपयांचा दंड ठोठावला असून, त्यातील ८ लाख रुपये मृतांच्या पालकांना आणि १ लाख रुपये तक्रारदार अर्फानला देण्याचे आदेश दिले आहेत.
या खटल्यात सरकारी वकील भारती होसमनी यांनी बाजू मांडली. निकालाच्या तांत्रिक बाबींविषयी प्रथम जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे सरकारी वकील आर. ए. गडकरी यांनी सविस्तर माहिती दिली आहे.


Recent Comments