विश्वप्रसिद्ध कमल बसदीमध्ये आयोजित धर्मचक्र आराधना महोत्सवात सहभागी झालेले मंत्री सतीश जारकीहोळी यांनी कन्नड भाषा आणि संस्कृतीच्या जडणघडणीत जैन समाजाने दिलेल्या योगदानाचे मुक्तकंठाने कौतुक केले.


बेळगावमधील ऐतिहासिक किल्ला परिसरातील कमल बसदीमध्ये २४ ते २८ एप्रिल दरम्यान पाच दिवसीय धर्मचक्र आराधना महोत्सव अत्यंत भक्तीभावात साजरा होत आहे. या सोहळ्यात जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी, महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार आसिफ सेठ, आमदार महांतेश कौजलगी तसेच मराठा लाईट इन्फंट्रीचे कमांडिंग ऑफिसर ब्रिगेडियर जयदीप मुखर्जी, समितीचे सचिव हिराचंद कलमनी, वाकरसा उपाध्यक्ष सुनील हनुमण्णवर यांनी उपस्थित राहून दर्शन घेतले.

या ऐतिहासिक महोत्सवात आमदार राजू सेठ, महांतेश कौजलगी, बाबासाहेब पाटील, विश्वास वैद्य, चन्नराज हट्टीहोळी आणि बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

यावेळी बोलताना सतीश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले की, या महोत्सवामुळे ऐतिहासिक स्थळांच्या जतनाला चालना मिळाली आहे. जैन मठांच्या विकासासाठी सरकारने १५ कोटींचा निधी मंजूर केला असून बेळगाव, शिवमोग्गा आणि मांड्या येथील पायाभूत सुविधा बळकट केल्या जात आहेत. सिद्धरामय्या सरकार अल्पसंख्याकांच्या कल्याणासाठी कटिबद्ध असून भविष्यात या स्थळांचा अधिक विकास केला जाईल, असे सतीश जारकीहोळी यांनी नमूद केले.
या धार्मिक उत्सवात विविध धर्म आणि संप्रदायांच्या भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विश्वशांतीसाठी प्रार्थना केली.


Recent Comments