Belagavi

राज्यातील १.८२ कोटी जनावरांना लाळ्या-खुरकुत प्रतिबंधक लस

Share

बेळगावमधील महांतेशनगर येथे पशुसंवर्धन मंत्री के. व्यंकटेश यांच्या हस्ते ‘लाळ्या-खुरकुत’ लसीकरण मोहिमेच्या नवव्या टप्प्याचा शुभारंभ करण्यात आला.

राज्यातील पशुधनाचे आरोग्य जपण्यासाठी सरकारने पावले उचलली असून, १ कोटी ८२ लाख जनावरांच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. यावेळी मंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी २५ टक्के सबसिडीची घोषणा करत मोठा दिलासा दिला आहे.

याप्रसंगी मंत्री व्यंकटेश म्हणाले की, “राज्यात दुग्धोत्पादन ७०-८० लाख लीटरवरून आता १ कोटी लीटरवर पोहोचले आहे. गरीब शेतकऱ्यांना गाई खरेदी करणे शक्य व्हावे यासाठी अर्थसंकल्पात २५ टक्के अनुदानाची तरतूद केली आहे. या योजनेतंर्गत बेळगाव आणि गुलबर्गा विभागांत २० हजार गाईंचे वाटप करण्यात येणार आहे.”

जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी बेळगावमधील दुग्धव्यवसायाचे कौतुक केले. पशुसंवर्धन विभागाच्या प्रयत्नांमुळे जिल्ह्यात नवी पशुवैद्यकीय रुग्णालये उभी राहत असून, शेतकऱ्यांनी या लसीकरण मोहिमेचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनीही सरकारच्या या योजनांमुळे ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होईल, असा विश्वास व्यक्त केला.

या सोहळ्याला आमदार आसिफ सेठ, गणेश हुक्केरी, बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, जिल्हा परिषद सीईओ राहुल शिंदे, पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Tags: