बेळगाव शहराला आंतरराष्ट्रीय दर्जाची शिस्त लावण्यासाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात येणार असून, वन वे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे पोलीस आयुक्त भूषण बोरासे यांनी स्पष्ट केले.

शुक्रवारी माळमारुती पोलीस ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना आयुक्त भूषण बोरासे यांनी शहरातील वाहतूक सुधारणेवर भर दिला. रविवार पेठेतील व्यापाऱ्यांनी वन वे नियमांसाठी सहमती दर्शवली असून, मध्यवर्ती बसस्थानक, चन्नम्मा चौक आणि न्यायालय परिसरात वाहन पार्किंगला शिस्त लावण्यासाठी विशेष नियोजन केल्याचे त्यांनी सांगितले.
हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात कैद्यांकडे मोबाईल सापडल्याप्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात एनआयएने दिलेल्या पत्रानंतर तांत्रिक तपास सुरू असून, मोबाईल आणि सिम कार्ड कोठून आले याचा शोध घेऊन महिनाभरात कडक कारवाई केली जाईल, अशी माहिती भूषण बोरासे यांनी दिली.
शहरातील रिक्षा प्रवाशांच्या, विशेषतः महिलांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक रिक्षात मालक आणि चालकाचा बायोडाटा असलेला क्यूआर कोड लावला जाणार आहे. हा कोड स्कॅन केल्यास रिक्षाचा मार्ग ट्रॅक करता येईल. शहरातील अधिकृत १० हजार रिक्षांना ही यंत्रणा लागू केली जाईल, असे पोलीस आयुक्तांनी नमूद केले.
शहरात नोंदणी नसलेल्या सुमारे २ हजार रिक्षा असून, त्यांना अधिकृत प्रवाहात आणण्यासाठी एका एजन्सीमार्फत ओळखपत्रे दिली जाणार आहेत. ऑटो चालकांनीही या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिला असून, प्रायोजकांच्या मदतीने विनामूल्य ओळखपत्रे आणि क्यूआर कोड प्रणाली कार्यान्वित केली जाईल, असे भूषण बोरासे यांनी सांगितले.


Recent Comments