बेळगाव महानगरपालिकेच्या वतीने मारुती गल्ली कॉर्नरवरील अनधिकृत बांधकामावर आज अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. लोकायुक्तांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली असून, यामुळे या भागातील व्यापारी आणि इमारत मालकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.


बेळगाव महानगरपालिकेच्या वतीने लोकायुक्त न्यायालयाच्या आदेशानुसार आज मारुती गल्ली कॉर्नर येथील इमारत अनधिकृत असल्याचे सांगत ती पाडण्याची कारवाई केली. मात्र, कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय किंवा नोटीस न देता ही कारवाई केल्याचा आरोप करत इमारत मालक आणि व्यापाऱ्यांनी प्रशासनाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.

महानगरपालिकेने कोणतीही नोटीस न देता ही कारवाई केली आहे. जर हे बांधकाम अनधिकृत होते, तर आमच्याकडे याचे खरेदीखत कसे आहे? आम्ही गेल्या ६० वर्षांपासून येथे वास्तव्यास असून इमारत बांधकामाची रीतसर परवानगीही घेण्यात आली आहे. मोहम्मद शरीफ मुल्ला नावाच्या व्यक्तीने कोणत्याही कागदपत्राशिवाय ही मालमत्ता आपली असल्याचा दावा केला असून, त्याची कोणतीही शहानिशा न करताच महानगरपालिका प्रशासनाने ही कारवाई केली असल्याचे शिवाजीराव हैबती यांनी म्हटले.
महानगरपालिकेने अचानक सुरू केलेल्या या कारवाईमुळे आमचे सुमारे २० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. मालक म्हणतात की नोटीस मिळाली नाही आणि महानगरपालिका म्हणते की नोटीस दिली होती. या गोंधळात आमच्या दुकानाचे प्रचंड नुकसान झाले असून ही भरपाई आता कोण देणार, अशी प्रतिक्रिया नूर जहॉं या व्यापाऱ्याने व्यक्त केली.
पहाटेच्या सुमारास ही मोहीम राबवण्यात आली. कर्ज काढून आम्ही आमचे छोटे दुकान सुरू केले होते, मात्र महानगरपालिकेने अचानक येऊन पाडापाडी केल्याने आमचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. दुकानातील साहित्य बाहेर काढण्यासही वेळ देण्यात आला नाही, अशा शब्दांत हीना यांनी आपली व्यथा मांडली.


Recent Comments