Belagavi

मराठा मंडळ पॉलिटेक्निकचा ‘व्हेंचुरा २.०’ सोहळा संपन्न

Share

बेळगावमधील मराठा मंडळ पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाचे वार्षिक स्नेहसंमेलन ‘व्हेंचुरा २.०’ मोठ्या उत्साहात पार पडले. तीन दिवस चाललेल्या या सांस्कृतिक सोहळ्यात विद्यार्थ्यांनी आपल्या विविध कलागुणांचे प्रभावी सादरीकरण केले.

या महोत्सवाची सुरुवात ९ एप्रिल रोजी ‘बॉलीवूड डे’ने झाली, तर दुसऱ्या दिवशी ‘ट्रेडिशनल डे’ साजरा करण्यात आला. या काळात आयोजित विविध सांस्कृतिक आणि क्रीडा स्पर्धांमधील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले.

मराठा मंडळ समूहाचे उपाध्यक्ष दिनकरराव ओवूळकर यांनी मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्राचार्य आर. एस. सूर्यवंशी यांनी महाविद्यालयाचा वार्षिक अहवाल सादर केला. शैक्षणिक क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा यावेळी सुवर्णपदक देऊन विशेष गौरव करण्यात आला.

सांस्कृतिक कार्यक्रमात रॅम्प वॉक स्पर्धेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यामध्ये संगणक विभागाने (CS) प्रथम, तर ई.सी. विभागाने द्वितीय क्रमांक मिळवत रोलिंग ट्रॉफीवर आपले नाव कोरले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी डीजेच्या तालावर डान्स करत महोत्सवाचा आनंद साजरा केला.

या प्रसंगी उपप्राचार्या आशा तोरवी, सांस्कृतिक समन्वयक शैला एम., विद्या पाटील, आर. एन. मोटार, क्रीडा समन्वयक सचिन वांगीकर, सार्थक बागल, झोहा मुजावर यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते. विद्या पाटील यांनी सूत्रसंचालन केले, तर मानसी अरळीमट्टी यांनी आभार मानले. पी. एस. पिंगट, शोधन चौगुले आणि दीपक तरळे यांनी कार्यक्रमाच्या नियोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.

Tags: