Belagavi

२१ एप्रिल रोजी निघणार भव्य शिवजयंती चित्ररथ मिरवणूक

Share

सालाबदप्रमाणे यंदाही २१ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता बेळगावमध्ये शिवजयंती चित्ररथ मिरवणूक मोठ्या उत्साहात काढण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवजयंती चित्ररथ महामंडळाची नियोजनासाठी महत्त्वाची बैठक धर्मवीर संभाजी महाराज चौक येथील जत्तीमठ येथे पार पडली.

महामंडळाचे अध्यक्ष सुनील जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत यंदाचा उत्सव अधिक भव्य आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्याबाबत चर्चा करण्यात आली. मिरवणूक वेळेत सुरू करून वेळेतच पूर्ण करण्यावर विशेष भर देण्यात आला असून, कोणताही वाद निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मंडळांच्या सर्व अडचणी सोडवण्यासाठी महामंडळ कटिबद्ध असल्याचे सुनील जाधव यांनी यावेळी स्पष्ट केले.

यंदाच्या उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे चित्ररथ स्पर्धा असून, प्रसाद मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा पार पडणार आहे. विजेत्या मंडळांना रोख पारितोषिक आणि मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. प्रत्येक मंडळाने चित्ररथ वेळेत मार्गावर आणावा आणि व्यसनांपासून दूर राहून शिस्त राखावी, असे आवाहनही बैठकीत करण्यात आले.

बेळगावची शिवजयंती ही देशातील एक मोठी परंपरा असून चित्ररथांच्या माध्यमातून शिवरायांच्या जीवनकार्याचे दर्शन घडते, असे मत साहित्यिक गुणवंत पाटील यांनी व्यक्त केले. या बैठकीला सुनील जाधव, जे. बी. शहापूरकर, गुणवंत पाटील, प्रसाद मोरे यांच्यासह अनेक शिवभक्त आणि विविध मंडळांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: