Vijayapura

विजापूरमध्ये पीएसआय विरुद्ध पोलीस कर्मचाऱ्यांचेच बंडाचे निशाण

Share

विजापूरमधील आदर्श नगर पोलीस ठाण्याचे पीएसआय सीताराम लमाणी यांच्या जाचाला कंटाळून तेथील पोलीस कर्मचाऱ्यांनी थेट राज्यपालांकडे धाव घेतली आहे. पीएसआय लमाणी हे विविध अवैध धंद्यांकडून ठराविक दराने वसुली करत असून कर्मचाऱ्यांचा छळ करत असल्याचा गंभीर आरोप या पत्राद्वारे करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीएसआय सीताराम लमाणी यांनी बार, ढाबा, तांदूळ तस्करी, गॅस विक्री आणि मावा-सिगारेट अशा अवैध धंद्यांसाठी ठराविक रक्कम निश्चित केली आहे. आदर्श नगर पोलीस ठाण्यात बदली करून घेण्यासाठी त्यांनी दिलेली मोठी रक्कम वसूल करण्यासाठी आता ते खालच्या कर्मचाऱ्यांकडून वसुली करून घेत आहेत, असा आरोप पीडित कर्मचाऱ्यांनी राज्यपाल, मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि आमदार यत्नाळ यांना पाठवलेल्या पत्रात केला आहे.

तसेच पीएसआय लमाणी हे केवळ आपल्या मर्जीतील कर्मचाऱ्यांना सुट्ट्या देतात आणि इतरांना कामाचा नाहक त्रास देतात, असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे. पोलीस दलातील या अंतर्गत भ्रष्टाचार आणि मनमानी कारभारामुळे विजापूर पोलीस दलात मोठी खळबळ उडाली असून, या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.

Tags: