Belagavi

बाळेकुंद्रीत बेळगाव डायरीजने दिले दोन मोरांना जीवदान

Share

बेळगावमधील बाळेकुंद्री येथे एका घराच्या आवारात संकटात सापडलेल्या दोन मोरांची ‘बेळगाव डायरीज्’ बचाव पथकाने यशस्वी सुटका केली आहे. नागरिकांनी दिलेल्या माहितीनंतर तातडीने राबवलेल्या या मोहिमेमुळे या राष्ट्रीय पक्षांना सुरक्षितपणे जीवदान मिळाले आहे.

बेळगाव तालुक्यातील बाळेकुंद्री गावातील एका घराच्या आवारात शनिवारी दोन मोर अडकल्याची घटना समोर आली. घराच्या मालकाने यासंदर्भात त्वरित माहिती दिल्यानंतर ‘बेळगाव डायरीज्’ या सामाजिक कार्यकर्त्यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

अवधूत तुडवेकर, गजानन गव्हाणे, पद्मप्रसाद हुली, विकी मेहता, गौतम श्राफ, शशिकांत आंबेवाडकर, निलेश हिरेहोळी आणि मायकल पिंटो या सदस्यांच्या पथकाने अत्यंत कौशल्याने आणि काळजीपूर्वक या दोन्ही मोरांना पकडून सुरक्षित केले.

सुटकेनंतर या मोरांना उपचारांसाठी बेळगावमधील कित्तूर राणी चन्नम्मा पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर मोरांची प्रकृती स्थिर असून, पुढील देखभालीसाठी त्यांना वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पथकाने दाखवलेल्या या प्रसंगावधानाचे आणि मानवतावादी कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Tags: