बेळगावमधील क्लब रोडवरील ईफा हॉटेलमध्ये आज सकाळी आग लागल्याची घटना घडली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा संशय व्यक्त केला जात असून अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.

कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या या हॉटेलमधून अचानक मोठ्या प्रमाणात धूर बाहेर येऊ लागला. आग लागल्याचे निदर्शनास येताच हॉटेल प्रशासनाने सतर्कता दाखवत सर्व ग्राहकांना आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे इमारतीबाहेर काढले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले आणि त्यांनी आग विझवण्याचे काम सुरू केले.
दरम्यान, घटनास्थळी उपस्थित असलेले नागरिक या घटनेचे व्हिडिओ चित्रीकरण करत असताना हॉटेल कर्मचाऱ्यांनी त्यांना मज्जाव केला. यावरून कर्मचारी आणि नागरिक यांच्यात काही वेळ शाब्दिक चकमक आणि गोंधळ उडाला. कॅम्प पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून आगीमुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज घेतला जात आहे.


Recent Comments