Vijayapura

​विजापूरमधील ऐतिहासिक भूतनाळ तलावात बुडून तिघांचा करुण अंत

Share

​विजापूरमधील ऐतिहासिक भूतनाळ तलावात पर्यटनासाठी आलेल्या एकाच कुटुंबातील तिघांचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.

बेंगळुरूहून विजापूरला पर्यटनासाठी आलेल्या १४ जणांच्या गटातील तिघे जण तलाव पाहण्यासाठी गेले असता ही दुर्घटना घडली. याबाबत
​मिळालेल्या अधिक माहितीनुसार, बेंगळुरूच्या आरटी नगर येथील रहिवासी असलेले मोहम्मद हयात (१२), हैदर पाशा (३२) आणि अब्दुल खुद्दूस (३५) अशी मृतांची नावे आहेत. १४ जणांचा हा गट विजापूरच्या सहलीवर आला असताना भूतनाळ तलावाच्या परिसरात गेला होता. यावेळी पाण्यात उतरलेला मोहम्मद हयात बुडू लागला असता त्याला वाचवण्यासाठी हैदर पाशा आणि अब्दुल खुद्दूस यांनी पाण्यात उडी घेतली, मात्र दुर्दैवाने तिघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला.

​या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि आदर्श नगर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. शोधमोहीम राबवून तिघांनाही बाहेर काढण्यात आले. मोहम्मद हयात आणि हैदर पाशा यांचा जागीच मृत्यू झाला होता, तर गंभीर अवस्थेत असलेल्या अब्दुल खुद्दूस यांनी रुग्णालयात नेत असताना वाटेतच प्राण सोडले.

​सर्व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी विजापूर जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले असून प्रक्रियेनंतर ते नातेवाईकांच्या ताब्यात दिले जातील. पोलीस वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली आहे. या घटनेबाबत आदर्श नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Tags: