बेळगावमध्ये एका वृद्धाची १५ कोटी रुपयांची डिजिटल फसवणूक झाल्याचे प्रकरण समोर आले असून, पोलिसांनी आतापर्यंत १ कोटी रुपयांची रक्कम गोठवली आहे. या प्रकरणाचे धागेदोरे देशातील विविध राज्यांपर्यंत पसरले असून पोलीस संशयितांचा शोध घेत आहेत.

वृद्धाच्या बँक खात्यातून १५ कोटी रुपये लांबवल्याच्या प्रकरणात आतापर्यंत १ कोटी रुपये ब्लॉक करण्यात यश आले आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिली. बुधवारी बेळगावमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी तपासाची माहिती दिली. फसवणूक झालेली रक्कम अहमदाबाद, कोलकाता, गुवाहाटी, हरियाणा आणि दिल्ली येथील १० बँक खात्यांमध्ये वर्ग करण्यात आली होती. हैदराबादमध्ये केलेल्या प्राथमिक तपासातून श्रीपाद नायक आणि शरद नायक यांनी एका खाजगी कंपनीच्या नावावर बनावट खाते तयार करून ही रक्कम वळवल्याचे समोर आले आहे. या आरोपींच्या अटकेसाठी विशेष पथक नेमण्यात आले असल्याचे भूषण बोरसे यांनी सांगितले.
१० कोटी रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक असल्यास तपास सीबीआयकडे सोपवण्याच्या सरकारी नियमानुसार कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणाची कागदपत्रे सीबीआयकडे हस्तांतरित करण्यासाठी तयारी पूर्ण होत आहे, अशी माहिती भूषण बोरसे यांनी दिली.
बेळगाव शहरात २९०० म्युल खाती सक्रिय असल्याचे तपासात उघड झाले आहे. नागरिकांनी कोणत्याही आमिषाला बळी पडून आपली बँक खाती कोणालाही भाड्याने देऊ नयेत, असे आवाहन भूषण बोरसे यांनी केले आहे.


Recent Comments