Belagavi

बेळगाव : सायबर फसवणूक प्रकरणी १ कोटीची रक्कम गोठवली

Share

बेळगावमधील एका वृद्धाची १५ कोटी रुपयांची डिजिटल फसवणूक झाल्याच्या प्रकरणात पोलिसांनी १ कोटी रुपयांची रक्कम गोठवली आहे. या आंतरराष्ट्रीय सायबर गुन्ह्याचे धागेदोरे अनेक राज्यांत पसरले असून, फसवणूक झालेली रक्कम मोठी असल्याने हा तपास आता सीबीआयकडे सोपवण्यात येणार आहे.

बेळगावमध्ये वृद्धाची १५ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांनी महत्त्वाची माहिती दिली. या प्रकरणातील रक्कम अहमदाबाद, कोलकाता, गुवाहाटी, हरियाणा आणि दिल्ली येथील १० वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये वर्ग करण्यात आली होती. हैद्राबादमध्ये करण्यात आलेल्या तपासाअंती श्रीपाद नायक आणि शरद नायक या दोन आरोपींनी एका खाजगी कंपनीच्या नावाने बनावट खाते उघडून ही रक्कम वळवल्याचे निष्पन्न झाले आहे. या आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष पथक तयार केले आहे.

नियमानुसार १० कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची फसवणूक असल्यास तपास सीबीआयकडे वर्ग करावा लागतो, त्यादृष्टीने सध्या कागदपत्रांची पूर्तता केली जात आहे. दुबईमध्ये बसून म्युल खात्याचा वापर करून बेळगावमधील व्यक्तीची कोटींची फसवणूक करणाऱ्या टोळीतील एका महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणातील दुबईत असलेल्या मुख्य आरोपीला पकडण्यासाठी देखील पोलिसांनी तांत्रिक हालचाली सुरू केल्या आहेत, असे भूषण बोरसे यांनी सांगितले.

बेळगाव शहरात सध्या २,९०० म्युल खाती सक्रिय असल्याची माहिती समोर आली आहे. पैशांच्या आमिषाला बळी पडून सार्वजनिक रित्या कोणीही आपले बँक खाते किंवा वैयक्तिक माहिती अनोळखी व्यक्तीला वापरण्यास देऊ नये. जर तुमचे खाते अशा बेकायदेशीर व्यवहारांसाठी वापरले गेले, तर खातेदारावरही कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा भूषण बोरसे यांनी दिला आहे.

Tags: