बेळगावमधील सुळेभावी येथे आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या ‘सुळेभावी श्री टॉप-१०’ ग्रामीण तालुकास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत सुनील भातकांडे याने ‘सुळेभावी श्री’ तर शिव मोदगेकर याने ‘कलमेश्वर श्री’ किताब पटकावत बाजी मारली.


भैरोबा फिटनेसच्या वतीने आयोजित या स्पर्धेत जिम स्तरावर जीवन विजापुरी याने प्रथम क्रमांक मिळवत ‘भैरोबा फिटनेस श्री’ किताबावर आपले नाव कोरले. सुळेभावीमधील कलमेश्वर मंदिर परिसरात ही स्पर्धा पार पडली. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महालक्ष्मी मंदिरचे विश्वस्त देवण्णा बांगेन्नावर, मारुती कालबर, परशराम कबालापूर आणि दयमण्णा मुरारी उपस्थित होते. सिदराय कुकडोळी आणि गंगप्पा कुकडोळी यांनी या स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले होते, तर अप्पया शिंदे यांनी स्पर्धेचे प्रायोजकत्व भूषवले.
स्पर्धेतील विजेत्यांना कल्लाप्पा चौगुले, सचिन मांडू, कांतू लखनगौडा, गंगाया पुजारी, नागेश चौगुले, नागेंद्र मांडू, रवी मिसाळे, मारुती बांगेन्नावर, विशाल पाटील, गौरांग गेंजी, हरीश मोळगे, सुरेश मारीहाळत आणि माल्लाप्पा बांगेन्नावर यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. खेळाडूंना आकर्षक चषक आणि सप्लीमेंट गिफ्ट हॅम्पर्स देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेचे तांत्रिक कामकाज आणि निकाल देण्याचे काम तज्ज्ञ परीक्षक मंडळाने पाहिले. यामध्ये अजित सिदनावर, एम. गंगाधर, हेमंत हवाल, अनंत लंगरकांडे, नूर मुल्ला, सुनील पवार, आकाश हुलीयर आणि गजानन हंगीरगेकर यांचा समावेश होता. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील, असे आधीच स्पष्ट करण्यात आले होते.
ही स्पर्धा बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कर्नाटक सरकारचे क्रीडा आणि युवा सेवा मंत्रालय तसेच कर्नाटक ऑलिंपिक असोसिएशनशी ही संघटना संलग्न आहे. ग्रामीण, रूट आणि जिम अशा तीन स्तरांवर ही स्पर्धा घेण्यात आली. शरीरसौष्ठवपटूंनी आपल्या पीळदार शरीरयष्टीचे प्रदर्शन करत उपस्थितांची मने जिंकली. सुळेभावी, मुचंडी, आष्टे, खानापूर, मोदगा, सांबरा, निलजी या भागातील खेळाडूंनी यात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता.


Recent Comments