Vijayapura

जयमृत्यंजय स्वामीजींवर लैंगिक शोषणाचे आरोप; महिला आयोगाकडे तक्रार दाखल

Share

लिंगायत पंचमसाली समाजाला आरक्षणासाठी लढा देणारे कुडलसंगम पंचमसाली पीठाचे बसव जयमृत्यंजय स्वामीजी यांच्यावर एका महिलेने लैंगिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणी राज्य महिला आयोगाकडे तक्रार करण्यात आली असून, स्वामीजींनी मात्र हे आरोप फेटाळत महिलेविरुद्ध ३ कोटींच्या खंडणीचा प्रतिआरोप केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बंगळूरमधील एका महिलेने राज्य महिला आयोगाकडे स्वामीजींविरुद्ध तक्रार दिली आहे. स्वामीजींनी अश्लील वर्तन केले असून, विवस्त्र व्हिडिओ कॉल करण्यासाठी मानसिक छळ केल्याचा आरोप या महिलेने केला आहे. ‘प्रसाद देतो’ असे सांगून स्वामीजींनी विश्वासाचा गैरफायदा घेतला आणि शारीरिक अत्याचार केले, असा दावा महिलेने आपल्या तक्रारीत केला आहे. तसेच, नग्न व्हिडिओ कॉल न केल्यास व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी स्वामीजी देत असल्याचेही तिने म्हटले आहे.

या प्रकरणाला कलाटणी मिळाली असून जयमृत्यंजय स्वामीजींनी विजापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात संबंधित महिलेविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या तक्रारीवरून एफआयआर नोंदवला असून स्वामीजींनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेने अनाथालय चालवत असल्याची बतावणी करून ओळख वाढवली होती. त्यानंतर ३ कोटी रुपयांची मागणी करत ती ब्लॅकमेल करत असल्याचे स्वामीजींनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे.

दरम्यान, महिला आयोगाकडे एका व्यक्तीने ही तक्रार आणून दिली होती. आयोगाने या तक्रारीची सत्यता पडताळण्यासाठी महिलेचा संपर्क क्रमांक आणि पत्ता मागितला असता, संबंधित व्यक्तीने वेगळाच क्रमांक देऊन तेथून काढता पाय घेतला. सध्या या प्रकरणातील आरोप-प्रत्यारोपांमुळे सार्वजनिक क्षेत्रात मोठी चर्चा सुरू असून सत्य शोधण्यासाठी सखोल चौकशीची मागणी होत आहे.

Tags: