शिक्षण प्रसारासाठी आणि लहान मुलांच्या सक्षमीकरणासाठी फेसबुक फ्रेंड्स टीमने पुढाकार घेत आज बेळगावमधील कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या शाळांमध्ये गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे यशस्वीरीत्या वाटप केले.


पहिलीच्या वर्गात नवीन प्रवेश घेतलेल्या १५० विद्यार्थ्यांना या मदतीचा लाभ मिळाला असून, त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. फेसबुक फ्रेंड्स टीम, श्री बाणेश्वरी स्टेशनरीचे मालक जितेंद्र लोहार आणि भारतीय सैन्यातील निवृत्त सैनिक व्हिक्टर फ्रान्सिस यांच्या समन्वयाने हा उदात्त उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमांतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांना १५० पाट्या, १५० दोन रेघी वह्या आणि खोडरबरसह १५० पेन्सिलचे संच प्रदान करण्यात आले. शैक्षणिक साहित्याचे हे संच पाहून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण पसरले होते.
यावेळी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या विविध शाळांमधील मुख्याध्यापकांची प्रमुख उपस्थिती होती. यामध्ये उर्दू प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका अंजुम कौसर चौधरी, मराठी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत बिरजे आणि इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्याध्यापक खादर अमरावती यांचा समावेश होता. मान्यवरांच्या हस्ते या साहित्याचे वितरण करण्यात आले.
कॅन्टोन्मेंट बोर्ड शाळांचे ब्रँड ॲम्बेसेडर संतोष आर. दरेकर यांनी या उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. “शालेय जीवनाची पहिली पायरी चढणाऱ्या या चिमुकल्यांना दिलेली ही छोटीशी मदत त्यांच्या शिक्षणासाठी मोठी प्रेरणा ठरेल,” असे संतोष दरेकर यांनी म्हटले. तसेच, ज्या दात्यांनी आणि समर्थकांनी या कार्यासाठी सढळ हाताने मदत केली, त्यांचेही फेसबुक फ्रेंड्स टीमच्या वतीने मनापासून आभार मानण्यात आले आहेत.


Recent Comments