बेळगावमधील जेएनएमसी वैद्यकीय महाविद्यालय परिसरात ‘कोटपा’ २००३ कायद्यांतर्गत जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने संयुक्त मोहीम राबवण्यात आली.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, जिल्हा अंमलबजावणी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे आणि तंबाखू उत्पादनांच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष जाहिराती लावणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली. विशेषतः शैक्षणिक संस्थांच्या १०० मीटर परिघात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या दुकानदारांना कायद्याचा बडगा दाखवण्यात आला.
या कारवाईत जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षाच्या सल्लागार डॉ. श्वेता पाटील, समाजसेविका कविता राजन्नवर आणि पोलीस विभागाचे बसवराज मजट्टी यांनी सहभाग घेतला. शैक्षणिक परिसराच्या पावित्र्याचे रक्षण करण्यासाठी यापुढील काळातही अशा प्रकारच्या धडक मोहिमा सुरू राहतील, अशी माहिती डॉ. श्वेता पाटील यांनी दिली.
या मोहिमेदरम्यान कोटपा कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकूण ४० गुन्हे दाखल करून संबंधितांकडून दंड वसूल करण्यात आला. केवळ कारवाई न करता, तंबाखू सेवनामुळे आरोग्यावर होणाऱ्या घातक परिणामांची माहिती देऊन नागरिकांचे प्रबोधनही करण्यात आले. सार्वजनिक आरोग्य जपण्यासाठी नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


Recent Comments