Belagavi

‘क्लाउड 9 टायगर्स’ संघाने पटकावले ओलिव्ह ग्रीन्स गोल्फ लीगचे विजेतेपद

Share

बेळगावच्या क्रीडा इतिहासात नवा अध्याय जोडणाऱ्या पहिल्या ‘ओलिव्ह ग्रीन्स गोल्फ लीग’ची उत्साहात सांगता झाली. चुरशीच्या ठरलेल्या अंतिम सामन्यात ‘क्लाउड 9 टायगर्स’ संघाने विजेतेपदावर आपले नाव कोरले.

बेळगावमधील ओलिव्ह ग्रीन्स गोल्फ मैदानावर पार पडलेल्या या प्रतिष्ठित लीगमध्ये अरुण किल्लेकर यांच्या मालकीच्या ‘क्लाउड 9 टायगर्स’ संघाने चमकदार कामगिरी करत करंडक पटकावला. राजेश कांबळे यांच्या ‘रॉयल किंग्स’ संघाने उपविजेतेपद मिळवले, तर कर्नल मोहन नायक आणि अभय कुलकर्णी यांच्या ‘दि मास्टर्स’ संघाने तिसरे स्थान पटकावले. मार्च महिन्यात झालेल्या लिलाव प्रक्रियेतून निवडले गेलेले खेळाडू आठ फ्रँचायझी संघांकडून मैदानात उतरले होते.

या समारोप समारंभाला ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी आणि कर्नल एच.यु. मराठे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विजेत्यांना चषक आणि रोख पारितोषिके प्रदान करण्यात आली. लीगमध्ये बसवराज पवार, देविका कांबळे आणि कर्नल नारायण सिंग भट्टी यांनी मोलाची कामगिरी बजावत ‘मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर’चा किताब पटकावला. या स्पर्धेत मिहीर पोतदार इलेव्हन, डायनॅमिक सिल्व्हरबिल्स स्टार, एसबीजी वॉरियर्स, युनिव्हर्सल ईगल्स आणि आदित्य एलिट चॅम्पियन्स या संघांनी सक्रिय सहभाग नोंदवला होता.

बेळगावमधील गोल्फ खेळाडूंना एक भव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या लीगचे आयोजन करण्यात आले होते. महिला आणि पुरुष गोल्फ खेळाडूंनी एकत्र येत या स्पर्धेत भाग घेतला हे या लीगचे विशेष आकर्षण ठरले. बेळगावच्या गोल्फ इतिहासातील हा एक मैलाचा दगड असून आगामी काळात हा खेळ अधिक मोठ्या स्तरावर पोहचेल, अशी आशा आयोजकांनी व्यक्त केली.

Tags: