समान कामासाठी समान वेतन मिळावे, या मुख्य मागणीसाठी अखिल कर्नाटक सरकारी परवानाधारक भूमापक संघटनेच्या वतीने आज बेळगावमध्ये भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनाला शेतकरी संघटनेनेही आपला पाठिंबा दर्शवत सक्रिय सहभाग नोंदवला.


बेळगावमधील राणी चन्नम्मा चौकात जमा झालेल्या भूमापकांनी आपल्या मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजी करत काही काळ ठिय्या आंदोलन केले. परवानाधारक भूमापकांना सरकारी भूमापकांप्रमाणेच सोयी-सुविधा आणि वेतन मिळावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

यावेळी बोलताना शेतकरी नेते शशिकांत गुरुजी यांनी सरकारवर जोरदार टीका केली. “राज्यातील हमी योजनांमुळे तिजोरीवर भार पडत असून, या योजना थांबवून भूमापकांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घ्यावे,” असे त्यांनी नमूद केले. सर्व्हे करणाऱ्या भूमापकांना मिळणाऱ्या तुटपुंज्या मानधनावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “आमदारांनी आपले वेतन कमी करून भूमापकांना सन्मानजनक वेतन द्यावे आणि रिक्त पदे त्वरित भरावीत,” अशी आक्रमक भूमिका शशिकांत गुरुजी यांनी मांडली.

संघाचे गौरव अध्यक्ष भार्गव यांनी गेल्या २५ वर्षांपासून महसूल विभागात सेवा बजावत असूनही सरकारकडून कोणतीही सेवासुरक्षा मिळत नसल्याचा आरोप केला. “आम्हाला वेठबिगारीसारखे राबवून घेतले जात असून महसूल विभाग सरकारची दिशाभूल करत आहे,” असा संशय त्यांनी व्यक्त केला.
रायचूर येथील महिला भूमापकांनी आपली व्यथा मांडताना सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला. “आम्ही सरकारी भूमापकांइतकेच काम करतो, तरीही आम्हाला वैद्यकीय सुविधा किंवा इतर लाभ मिळत नाहीत. रजा घेतल्यास पुन्हा परीक्षा देण्याची अट अन्यायकारक आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.
या आंदोलनामध्ये राज्यातील विविध भागांतील परवानाधारक भूमापक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आपल्या मागण्या लवकर पूर्ण न झाल्यास ‘बेंगळुरू बंद’ करून तीव्र लढा देण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
शेतकरी संघटनेचे नेते चूनप्पा पुजेरी यांनी भूमापकांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे. राज्यातील ३१ जिल्ह्यांतील शेतकरी संघटना या लढ्यात भूमापकांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. येणाऱ्या पोटनिवडणुकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी भूमापकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा बेंगळुरूमध्ये तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा चूनप्पा पुजेरी यांनी दिला आहे. गेल्या २३ वर्षांपासून सातत्याने सेवा बजावत असलेल्या भूमापकांना सरकारने न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी चूनप्पा पुजेरी यांनी केली आहे.


Recent Comments