सौंदत्ती यल्लम्मा देवीच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांना पिण्याच्या पाण्याच्या टँकरवरून त्रास दिल्याचा प्रकार समोर आला आहे. नागेनहट्टी येथील ग्रामविकास अधिकारी आणि पोलिसांच्या वर्तणुकीचा निषेध करण्यासाठी शेकडो भाविकांनी बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यावर मरुली मोर्चा काढून संताप व्यक्त केला.

बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील नागेनहट्टी येथील श्री रेणुका यल्लम्मा देवीचे भक्त वडगावमधील ग्रामीण पोलीस ठाण्यात एकत्र जमले होते. सौंदत्ती येथील दवण पौर्णिमेच्या यात्रेला जाणाऱ्या भाविकांनी पिण्याच्या पाण्यासाठी टँकर नेण्याची परवानगी मागितली असता, पीडीओने सुरुवातीला संमती दिली. मात्र, दुसऱ्याच दिवशी या अधिकाऱ्याने आपली भूमिका बदलून पोलिसांत तक्रार केल्याने वादाला तोंड फुटले.

टँकर एका तासात परत न केल्यास संबंधितांना आत टाकू, अशी धमकी ग्रामीण पोलिसांनी फोनवरून दिल्याने भाविक आक्रमक झाले. यात्रेहून परतताच भाविकांनी थेट पोलीस ठाणे गाठले आणि ‘उदो उदो’च्या घोषणा देत परिसरात ठिय्या मांडला. आधी परवानगी देऊन नंतर गुन्हेगार ठरवणाऱ्या नागेनहट्टीच्या पीडीओला तातडीने सेवेतून बडतर्फ करावे, अशी मागणी धनंजय जाधव यांनी यावेळी केली.
या आंदोलनात नागेनहट्टी गावातील ग्रामस्थ आणि देवीचे भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जोपर्यंत संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई होत नाही आणि पोलिसांकडून योग्य स्पष्टीकरण मिळत नाही, तोपर्यंत माघार घेणार नसल्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला .
सिंचन योजनेच्या निधीतून ग्रामस्थांसाठी खरेदी केलेला हा टँकर गेली अनेक वर्षे यात्रेसाठी वापरला जातो. आठ दिवसांपूर्वीच रीतसर परवानगी घेऊन टँकर नेला असतानाही, आता कोणाच्या तरी दबावाखाली येऊन पीडीओ) आडमुठी भूमिका घेत असल्याचा आरोप काही ग्रामस्थांनी केला असून त्यांच्या कार्यपद्धतीचा तीव्र निषेध करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलिसांकडून अटकेची धमकी मिळाल्याचा आरोप करत संतापलेल्या शेकडो भाविकांनी बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून ‘उदो उदो’च्या घोषणा देत प्रशासनाचा निषेध नोंदवला.


Recent Comments