Belagavi

निपाणी : बेनाडीतील समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Share

निपाणी तालुक्यातील बेनाडी गावातील समस्या आणि काळम्मावाडी कालव्यावरील पुलाच्या कामात होणाऱ्या विलंबाच्या निषेधार्थ आज राज्य शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

बेळगावमध्ये आज राज्य शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. या निवेदनावर जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून संबंधित विभागांना सूचना केल्या आहेत.

निपाणी तालुक्यातील बेनाडी गावामध्ये गटारी आणि रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली असून कोणतीही मूलभूत सुविधा उपलब्ध नाही. गावातील नैसर्गिक नाला काहींनी मध्यभागीच बंद केल्याने पावसाचे पाणी गावात साचत आहे. अनेक वर्षांच्या संघर्षानंतर अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले होते, मात्र वर्ष उलटूनही कोणतेही काम सुरू झालेले नाही. अप्पाचीवाडी जवळ महाराष्ट्राच्या काळम्मावाडी कालव्याचे पाणी आले आहे, परंतु २० वर्षे उलटूनही तिथे पुलाचे काम पूर्ण झालेले नाही. हे काम तातडीने सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. जर कामाला सुरुवात झाली नाही, तर निपाणी पाटबंधारे विभागाला घेराव घालू, असा इशारा राज्य सचिव राजू पवार यांनी दिला आहे.

बेनाडी गावातील मातंग समाजाच्या वस्तीत गटारीचे पाणी सोडले जात असल्याने येथील नागरिकांवर अन्याय होत आहे. यामुळे परिसरात चालणे कठीण झाले असून संसर्गजन्य आजारांची भीती निर्माण झाली आहे. स्थानिक ग्रामपंचायत विकास अधिकारी आणि तालुका प्रशासन केवळ आश्वासने देत असून कोणतीही ठोस कारवाई करत नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी आता समस्या निवारणाचे आदेश दिले आहेत, याचे पालन न झाल्यास ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकून सरकारला उत्तर देऊ, अशी प्रतिक्रिया राज्य सचिव किशन नंदी यांनी व्यक्त केली.

यावेळी निपाणी तालुक्यातील बेनाडी आणि अप्पाचीवाडी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: