बेळगाव शहरातील ऐतिहासिक सेंट्रल मेथोडिस्ट चर्चसह विविध चर्चमध्ये आज गुड फ्रायडे अत्यंत भक्तीभावाने आणि गांभीर्याने साजरा करण्यात आला. जगाच्या पापमुक्तीसाठी येशू ख्रिस्तांनी दिलेल्या बलिदानाचे स्मरण करत ख्रिस्त बांधवांनी यावेळी विशेष प्रार्थना केली.

बेळगावमधील सेंट्रल मेथोडिस्ट चर्चमध्ये आयोजित विशेष प्रार्थना सभेत ख्रिस्त बांधव मोठ्या संख्येने एकत्र आले होते. यावेळी सर्वांनी सामूहिक रित्या जागतिक शांततेसाठी प्रार्थना केली.
यानंतर रेव्ह्रंड शांतप्पा अंकलगी, रेव्ह्रंड सी. एस. हुलगेरी आणि रेव्ह्रंड संजय सॅम्युएल यांनी भाविकांना गुड फ्रायडेचा संदेश दिला. येशू ख्रिस्तांनी मानवजातीच्या कल्याणासाठी दिलेला निस्वार्थ त्याग आणि सोसलेल्या यातना हा समाजासाठी दीपस्तंभ आहे. हा केवळ दुःखाचा दिवस नसून अन्यायावर सत्याच्या विजयाचा पवित्र दिवस असल्याचे त्यांनी सांगितले.
क्रूसावर खिळलेले असतानाही शत्रूंना क्षमा मागणाऱ्या येशू ख्रिस्तांची क्षमावृत्ती हाच या दिवसाचा संदेश आहे. येशूंचे शब्द सूडापेक्षा प्रेमाचा मार्ग मोठा असल्याचे शिकवतात. गुड फ्रायडे हा अंत नसून पुनरुत्थानाची आशा असून अधर्मावर धर्माचा विजय निश्चित आहे, अशा शब्दांत रेव्ह्रंड शांतप्पा अंकलगी यांनी भावना व्यक्त केल्या.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, बेळगावमध्ये विविध ठिकाणी उपवास आणि प्रार्थनेद्वारे येशू ख्रिस्तांना भक्तीपूर्वक मानवंदना अर्पण करण्यात आली. या प्रसंगी ख्रिस्त बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments