Belagavi

बेळगाव महानगरपालिकेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीची जय्यत तयारी

Share

डॉ. बी.आर. आंबेडकर जयंती यावर्षी बेळगावमध्ये अत्यंत संस्मरणीय पद्धतीने साजरी करण्यासाठी महानगरपालिकेने पुढाकार घेतला असून, आज महापौरांच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भात महत्त्वाची पूर्वतयारी बैठक पार पडली.

बेळगाव महानगरपालिकेच्या महापौर प्रीती कामकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत जयंती उत्सवाचा आराखडा तयार करण्यात आला. १२ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या या उत्सवात कॅम्पमधील आंबेडकर मार्गावरून भव्य मिरवणूक निघणार असून, राणी चन्नम्मा चौकात तिचा समारोप होईल. यावेळी सुमारे २५ हजार लोकांसाठी भोजनाची सोय, आकर्षक चित्ररथांना पारितोषिके आणि युवकांसाठी क्रिकेट टूर्नामेंटचे आयोजन करून संपूर्ण शहर निळेमय करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

केवळ उत्सवापुरते मर्यादित न राहता बाबासाहेबांचे ‘शिक्षण’ हे तत्त्व प्रत्यक्षात आणण्यासाठी दलित नेते मल्लेेश चौगुले यांनी महापालिकेकडे पाच सूत्री मागण्या मांडल्या आहेत. महापालिकेच्या शाळांच्या दर्जाचे ‘विशेष ऑडिट’ करावे, शाळाबाह्य मुलांसाठी ‘बॅक टू स्कूल’ मोहीम राबवावी आणि गरीब विद्यार्थ्यांना एकाच छताखाली सर्व सुविधा मिळण्यासाठी ‘सिंगल विंडो सिस्टम’ लागू करावी, असे प्रस्ताव मल्लेेश चौगुले यांनी मांडले.

यासोबतच बाबासाहेबांनी बेळगावमध्ये ज्या ऐतिहासिक ठिकाणांना भेटी दिल्या होत्या, तिथे संग्रहालय उभारण्याची सूचनाही करण्यात आली. संविधानाच्या मूल्यांबाबत जनजागृती करण्यासाठी ‘अर्बन सिव्हिक अवेअरनेस’ कार्यक्रम आणि महापालिका शाळांचे ‘मॉडेल एज्युकेशन झोन’मध्ये रूपांतर करण्याची घोषणा जयंतीदिनीच करावी, अशी मागणी मल्लेेश चौगुले यांनी केली.

या बैठकीनंतर नूतन महापौर प्रीती कामकर, उपमहापौर हनुमंत कोंगाळी आणि आमदार आसिफ सेठ यांचा दलित नेत्यांच्या वतीने सत्कार करून गौरव करण्यात आला. यावेळी विविध संघटनांचे प्रतिनिधी आणि महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

Tags: