Belagavi

बेळगावच्या जयनगरमधील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात जन्मोत्सव सोहळा

Share

बेळगावमधील जयनगर येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात हनुमान जयंतीचा उत्सव अत्यंत भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त मंदिरात पहाटेपासूनच विविध धार्मिक विधींचे आयोजन करण्यात आले होते.

जन्मोत्सवाच्या निमित्ताने मारुतीरायाच्या मूर्तीला विशेष अभिषेक घालून विधीवत पूजा आणि महाआरती करण्यात आली. यंदाच्या उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे हनुमंताला केलेली विशेष सजावट. तिरुपती बालाजी मंदिराच्या धर्तीवर अत्यंत मनमोहक पद्धतीने केलेली येथील सजावट आणि आरास पाहण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

परंपरेनुसार, सुवासिनींनी बाल हनुमानाची मूर्ती पाळण्यात ठेवून पाळणा सोहळा उत्साहात साजरा केला. यावेळी महिलांनी गायलेल्या भक्तीगीतांनी मंदिर परिसर दुमदुमून गेला होता.

दरवर्षीप्रमाणे यंदाही मंदिरात भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे ४ ते ५ हजार भाविकांनी हनुमंताचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला. जयनगर परिसरातील भाविकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे या जन्मोत्सवाला विशेष शोभा आली होती.

Tags: