Vijayapura

मी मुख्यमंत्री झालो तर मुस्लिम समाजाचा अल्पसंख्याक दर्जा रद्द करेन; आमदार यत्नाळ

Share

विजापूरचे आमदार यत्नाळ आणि मंत्री एम.बी. पाटील यांच्यातील राजकीय कलगीतुरा आता विकोपाला गेला असून, यत्नाळ यांनी थेट ‘मुस्लिम समाजाचा अल्पसंख्याक दर्जा रद्द’ करण्याचा आणि ‘योगी मॉडेल’ राबवण्याचे विधान केले आहे.

आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी मंत्री एम.बी. पाटील यांच्या आव्हानाला जशास तसे उत्तर देताना भाजपमधील आपल्या भविष्याबद्दल मोठी भविष्यवाणी केली आहे. “मी कोणाकडेही पक्षात घेण्याची गयावया करणार नाही, उलट एक दिवस भाजप नेतृत्व येडियुरप्पा आणि त्यांच्या मुलाला डावलून मला सन्मानाने बोलावेल,” असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच बागेवाडीतील काँग्रेसच्या अंतर्गत फुटीवर बोट ठेवत, एम.बी. पाटील यांनी मला स्वाभिमानाचे धडे देण्यापेक्षा स्वतःच्या पक्षातील सावळागोंधळ सुधारावा, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.

दुसरीकडे, आपल्या कट्टर हिंदुत्ववादी प्रतिमेला साजेशी घोषणा करत यत्नाळ यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. “जर मी मुख्यमंत्री झालो, तर पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत मुस्लिम समाजाचा अल्पसंख्याक दर्जा काढून टाकेन आणि त्यांच्या जागी मराठा, ब्राह्मण व क्षत्रिय यांसारख्या खऱ्या अल्पसंख्याक घटकांना आरक्षण व सवलती देईन,” असे त्यांनी स्पष्ट केले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याप्रमाणेच कर्नाटकात कडक प्रशासन राबवण्याचा मानस व्यक्त करत त्यांनी बागलकोट पोटनिवडणुकीत भाजपच्या प्रचाराला जाणार असल्याचे जाहीर केले.

Tags: